१० तालुके हादरले; पेठमध्ये घरांसह मंदिराच्या भिंतींना तडे, सुरगाण्यात सिस्मोग्राफ कार्यान्वित
साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण परिसरात जुलै महिन्यात सलग भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता पुन्हा भूकंपाच्या मालिकेने नागरिकांची चिंता वाढवली आहे. दि. ५, ६ आणि ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील विविध भागांना भूकंपाचे हादरे बसले. शनिवारी रात्री १० वाजून ९ मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदविण्यात आली. यानंतर रात्री उशिरा आणि रविवारी पहाटे आणखी तीन धक्के जाणवले.
या भूकंपामुळे नाशिक शहरासह दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, बागलाण, चांदवड, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांतील नागरिकांना हादरे जाणवले. या वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक तीव्र भूकंप असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २९ जुलैपासून जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २० भूकंपीय धक्के नोंदविण्यात आले आहेत.
शनिवारी रात्रीच्या भूकंपाचा केंद्रबिंदू सुरगाणा तालुक्याच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले असून, भूकंपाची खोली सुमारे पाच किलोमीटर होती. केंद्रबिंदू २०.४२४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ अंश पूर्व रेखांशावर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पेठ तालुक्यातील काही गावांमध्ये या धक्क्याचा परिणाम अधिक जाणवला. काही घरांच्या तसेच मंदिरांच्या भिंतींना तडे गेले, तर पहुचीबारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला भगदाड पडल्याचे सांगण्यात आले. जुनोठी येथे मंदिराची भिंत कोसळल्याची माहितीही समोर आली आहे.
नाशिक शहरातील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हादरे प्रकर्षाने जाणवले. चांदवड आणि देवळा परिसरात धक्क्याची तीव्रता तुलनेने कमी होती, तर पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचे हादरे जाणवले. अचानक जमिनीला कंप सुटल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले.
सुरगाणा परिसरातील नागरिकांनी भूकंपाचा अनुभव सांगताना रात्रीच्या वेळी अचानक जमिनीतून गडगडाटाचा आवाज आल्याचे सांगितले. घरातील वस्तू तसेच जेवणाची ताटे थरथरू लागल्याने नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्येही नागरिक चौकात एकत्र जमले होते.
१२ तासांत सहा धक्के
जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींना दि. २९ जुलैपासून सुरुवात झाली. त्यानंतर सुरगाणा, दिंडोरी आणि परिसरात सातत्याने सौम्य धक्के नोंदविले जात आहेत. विशेष म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अवघ्या १२ तासांच्या कालावधीत सहा भूकंपीय धक्के नोंदविण्यात आल्याने प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे.
शनिवारी रात्री १० वाजून ९ मिनिटांनी ४.३ रिश्टर स्केलचा धक्का जाणवल्यानंतर रविवारी पहाटे १ वाजून ३४ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केल, १ वाजून ४३ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केल आणि पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी ३.३ रिश्टर स्केलचा धक्का नोंदविण्यात आला.
सुरगाण्यात अत्याधुनिक सिस्मोग्राफ
भूकंपाच्या हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा तहसील कार्यालयात अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित केला आहे. या यंत्रणेद्वारे परिसरातील भूकंपीय हालचालींची माहिती प्रत्यक्ष वेळेत नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे भविष्यातील भूकंपाच्या हालचालींचा अधिक बारकाईने अभ्यास करणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या प्राथमिक निरीक्षणानुसार गुजरात सीमेलगतच्या या भागातील बेसॉल्ट खडकांच्या थरांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपीय कंपन निर्माण होत असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी जमिनीत खोलवर मुरल्याने भूगर्भातील ताणात बदल झाला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कच्च्या घरांबाबत प्रशासनाचा इशारा
४.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे कच्च्या आणि विशेषतः दगड-मातीच्या बांधकामाच्या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धक्के जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तहसील कार्यालय, पोलिस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जलसंपदा विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला आहे.
भूकंपाच्या वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
