साईमत नाशिक प्रतिनिधी
गंगापूर पोलिसांच्या हद्दीतील राका कॉलनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. होलसेल मोबाईल विक्री दुकानातील अकाउंटंटवर बाऊन्सरकरवी झालेल्या अमानुष मारहाणीचा आणि सततच्या दहशतीचा शेवट आत्महत्येत झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रविण अरुण धनाईत (वय २९, रा. आराध्या स्पार्कल, यमुनानगर, चांदशी शिवार) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राका कॉलनीतील ‘क्रिएशन टेलिकॉम’ या होलसेल मोबाईल दुकानात प्रविण गेल्या पाच वर्षांपासून अकाउंटंट म्हणून कार्यरत होता. दुकानमालक अमोल जीवनलाल समदडीया व तुषार जीवनलाल समदडीया या भावांशी जुलै २०२५ मध्ये त्याचा वाद झाला. त्यानंतर प्रविणने नोकरी सोडली. मात्र, दहा दिवसांनी समदडीया भावांनी प्रविणसह अन्य नऊ जणांविरोधात वणी पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, या गुन्ह्याची माहिती प्रविणला आधी देण्यात आलेली नव्हती.
तक्रार दाखल होण्यापूर्वीच समदडीया भावांनी ‘मोबाईल परत देतो’ या बहाण्याने प्रविणला दुकानात बोलावून घेतले आणि थेट वणी पोलिसांच्या ताब्यात दिले. खोटी तक्रार करून मला गोवण्यात आले आहे, असे सांगत प्रविणने वडील अरुण धनाईत यांच्याकडे मदतीची याचना केली. वडिलांनी त्याचा जामीन करून घेतला. मात्र, त्यानंतर प्रविण मानसिकदृष्ट्या खचला होता, अबोल झाला होता आणि सतत दहशतीखाली वावरत होता.
वडिलांच्या तक्रारीनुसार, याआधीही समदडीया भावांनी प्रविणला दुकानात बोलावून बाऊन्सरमार्फत जबर मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा एक दातही तुटला होता. हा सारा प्रकार त्याने वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार करण्याची तयारी दर्शवली. मात्र, कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगत प्रविणने तक्रार देण्यास नकार दिला.
२२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रविण घरातून बाहेर पडला. रात्री दहा वाजता त्याने वडिलांना फोन करून ‘घरी येतोय’ असे सांगितले. मात्र, तो परतलाच नाही. अखेर गंगापूर पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली. शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी चांदशीकडील पुलाजवळ गोदावरी नदीपात्रात प्रविणचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्यानंतर वडील अरुण धनाईत यांनी दुकानमालक भावांविरोधात गंभीर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणात समदडीया भावांचा शोध सुरू असून, बाऊन्सरची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. वणी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीची कागदपत्रे मागवण्यात आली असून, कॉल डिटेल्स, मोबाईल चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल आहिरराव पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे ‘दहशत, मारहाण आणि मानसिक छळ यामुळे एका तरुणाने आयुष्य संपवलं’ या गंभीर प्रश्नावर पुन्हा एकदा समाज आणि प्रशासनासमोर आरसा उभा राहिला आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
