यश सुनील झाडे यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलीस तपास सुरू
साईमत/ नागपूर / प्रतिनिधी
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ताजी घटना समोर येत असतानाच, नागपूरमध्येही एका १२ वीच्या विद्यार्थ्याने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. मृतकाचे नाव यश सुनील झाडे असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
माहितीनुसार, यश झाडे मानेवाडा येथील जवाहर नगर परिसरात राहात होता. नुकत्याच संपलेल्या १२ वीच्या परीक्षांनंतरही तो दररोज घरच्यांना “पेपर आहे” असे सांगून बाहेर जात असे. कालदेखील त्याने घरातून पेपर असल्याचे सांगून निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत परत आला नाही आणि त्याचा फोनही बंद होता.
कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली. पोलीस तपासादरम्यान समजले की, यशने एम्प्रेस मॉलमधील चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येची घटना घडवली आहे.
पोलीस घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तर पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
