साईमत/ न्यूज नेटवर्क । फैजपूर।
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राध्यापकांची बहुप्रतिष्ठीत संघटना एन.मुक्टोच्यावतीने कॅस अंतर्गत विलंबाने झालेल्या पदोन्नती, आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रलंबित असलेली प्रकरणे, त्यामुळे होणारे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात झालेला बदल, विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संबंधीचे प्रश्न, पदवी स्तरावर कॅरीऑन पद्धत सुरू करावी, विद्यार्थ्यांचे ड्रॉप आऊट कमी व्हावे अश्या अनेक प्रश्नांवर खबरदारी आणि उपाय म्हणून डॉ.व्ही.एल.महेश्वरी-कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी चर्चेसाठी वेळ मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वीच निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी, २५ जून रोजी कुलगुरू यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी प्र.कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे, संचालक डॉ.विनोद पाटील, डॉ.योगेश पाटील व एन.मुक्टो.संघटनेचे शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.
कुलगुरुंनी त्या अनुषंगाने एन.मुक्टो. संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठाच्या अधिकार कक्षेतील मागण्यांबाबत तांत्रिक गोष्टी पूर्ण करून लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच राज्य शासनाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या मागण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांचे हित लक्षात घेऊन शासनातर्फे योग्य मार्गदर्शन मागवून त्याही बाबतीत निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
सभेसाठी एन.मुक्टोचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.नितीन बाविस्कर, सचिव डॉ.बी.टी.पाटील, केंद्रीय सहसचिव डॉ.विजय सोनजे, जळगाव जिल्हा सचिव डॉ.ए.डी.गोस्वामी, एम.फुक्टो कार्यकारिणी सदस्य डॉ.संजय सोनवणे, एनमुक्टोचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल पाटील, प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा.सुरेखा पालवे, विद्या परीषद सदस्य प्राचार्य डॉ.हेमंत महाजन, सिनेट सदस्य डॉ.संदीप नेरकर, संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नियामक मंडळाचे सदस्य डॉ.महेंद्र सोनवणे, डॉ.अजय पाटील, डॉ.सी.आर.पाटील, प्रा.वासुदेव वले, प्रा.डॉ.सोनवणे, डॉ.एस.एन.पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.