नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी खोपोली पॅटर्न राबवावा

0
23

साईमत बोदवड प्रतिनिधी

बोदवड शहर‌ स्वच्छ झाले पाहिजे.‌ प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी.‌ यासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेचा आदर्श घेत बोदवड मध्ये खोपोली पॅटर्न राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

बोदवड नगरपंचायत कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी नगरपंचायत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी गजानन तायडे, तहसीलदार मयुर कळसे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, तालुक्यात‌ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात यावा.कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प तयार करण्यात यावा.‌ओला व सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी.शहरात नवीन इमारतीला परवानगी देतांना राडारोडा साफ केला असल्यास परवानगी देण्यात यावी. कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करण्याचे काम करावे.सांडपाण्याचे नियोजन करण्यात यावे.माझी वसुंधरा अभियानात वृक्षारोपणाचे काम त्वरित करण्यात यावे.बंखळ क्षेत्रात‌ वृक्षरोपण‌ करण्यात यावे,स्वच्छ मिशनमध्ये काम करण्यात यावे.
स्वच्छतेसाठी लोकांची मानसिकता तयार करण्यात यावी.‌कर वसूलीकडे लक्ष देण्यात यावे.३१ ऑक्टोबर पर्यंत ७५ टक्क्यांपर्यंत वसूली झाली पाहिजे.पथदिवे लावण्यात यावे. ज्याठिकाणी महिलांना वावरतांना असुरक्षित वाटत असेल अशा ठिकाणी पथदिवे लावण्यात यावे.दिव्यांग निधी खर्च करण्यात यावा.जिल्हा नियोजनाची मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी.२०२२-२३ मधील प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा.दलित वस्तीच्या निधीचा योग्य विनियोग करण्यात यावा,अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here