भुयारी गटारीच्या चेंबरमध्ये वृक्ष लावून नगरपरिषदेचा निषेध

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील पवार वाडीतील विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोरील मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्याच्या लेव्हलने मुख्य चेंबर बनविले आहे. त्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे झाले आहे. त्यात पडून वाहनधारकांना दुखापत होत असल्याने चाळीसगाव नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवीन झालेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात रयत सेनेच्यावतीने वृक्ष लावून नगरपरिषदेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. येत्या आठवड्याभरात मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबरची उंची वाढविण्यात यावी, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करण्याचा इशारा रयत सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

चाळीसगाव नगर परिषदेच्यावतीने प्रभाग क्रमांक १० मध्ये मलनिसारण योजनेचे काम म्हणजेच भुयारी गटारीचे कामे पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्याच्या लेव्हलने मुख्य चेंबर बनविण्यात आल्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या व नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे झाले आहे. खड्ड्यात रस्त्यावरून जाणारे वाहन चालक खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यामध्ये नागरिक, महिला पडून जखमी होत आहे.नियमांप्रमाणे नवीन होणाऱ्या रस्त्याच्या उंचीप्रमाणे मुख्य चेंबरची लेव्हल साधणे गरजेचे असताना तसे काम करण्यात न आल्याने रस्ता चांगला होऊनही रस्त्यामध्ये एक फुटाचे खड्डे असल्याने वाहनधारकांना दुखापत होत आहे.

यापूर्वी चाळीसगाव नगर परिषद येथे रयत सेनेच्यावतीने दोन वेळा आंदोलन करून मुख्य चेंबरची उंची वाढविण्यासाठी मागणी केली आहे. या समस्येकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत ठोंबरे दुर्लक्ष करत असल्यामुळे रस्त्यावरील मधोमध असलेल्या खड्ड्यांमध्ये पडून कोणाचा जीव जाण्याची मुख्याधिकारी वाट पाहत आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत सेनेच्यावतीने रविवारी, २१ रोजी विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर पवारवाडी येथे नवीन झालेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्यात वृक्ष लावून नगरपरिषदेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात यांचा होता सहभाग

आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुकाध्यक्ष संजय हिरेकर, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवळी, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, वाहतूक सेनेचे प्रकाश गवळी, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, दिलीप पवार, गुलाब दुसिंग, निंबा पाटील, किशोर भोई, रमेश पवार, तुळशीदास वाकोडे, मंगेश देठे आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here