वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेची मोठी कारवाई; जेसीबीच्या ताफ्यासह धडक मोहीम
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात सुरू केलेली मोहीम शुक्रवारी (२४ एप्रिल) मानराज पार्क ते खोटे नगर परिसरात अधिक तीव्र झाली. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या कारवाईत रस्त्यालगतची अनधिकृत दुकाने, टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या फौजफाट्यासह या भागात प्रवेश करताच परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक अतिक्रमणधारकांनी तातडीने आपली दुकाने हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही ठिकाणी पथकाने थेट कारवाई करत साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान एका महिलेने पथकाशी वाद घालत विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने संयम राखत कारवाई सुरूच ठेवली.
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील मुख्य व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सातत्याने राबवली जात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि रस्ते नागरिकांसाठी मोकळे राहावेत, या उद्देशाने ही कारवाई हाती घेण्यात आली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेत जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यात आली असून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे उभी असलेली वाहनेही जप्त करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी व अतिक्रमणधारकांमध्ये घबराट पसरली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यांवरील कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा पुढील कारवाई अधिक कठोर असेल तसेच जप्ती आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
दरम्यान, आगामी काळात ही अतिक्रमण हटाव मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले असून शहरातील इतर भागांमध्येही अशीच धडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
