मुकेश सपकाळे खून प्रकरणात किरण हटकरला जन्मठेप, ५ निर्दोष

0
4

साईमत जळगाव प्रतिनिधी

दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भावाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे या तरूणाचा चाकू भोसकून प्रतिष्ठित मु. जे. महाविद्यालयात सन २०१९ साली निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात किरण अशोक हटकर (वय-२४, रा. नेहरू नगर, जळगाव) याला बुधवारी १३ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती बी.एस. वावरे यांनी ठोठावली. तर त्याच्यासोबतचे ५ जण निर्दोष सुटले आहेत.

याबाबत माहिती अशी की, रोहित मधुकर सपकाळे रा. आसोदा, ता.जि.जळगाव हा २९ जून २०१९ रोजी मु.जे.महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये आला होता. इच्छाराम पुंडलिक वाघोदे (वय २२, रा.समतानगर) याच्या गाडीला मयत मुकेशचा लहान भाऊ रोहितचा दुचाकी पार्कींग करताना धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावर रोहीतने आपला भाऊ याच महाविद्यालयात शिकत असल्याचे ‘त्याला बोलावतो’ असे सांगितल्यानंतर इच्छारामने देखील किरण अशोक हटकर (वय २०, रा. नेहरु नगर), अरुण बळीराम सोनवणे (वय २३, रा. आंबेडकर चौक, समता नगर), मयूर अशोक माळी (वय १८, रा. जाकीर हुसेन कॉलनी, महाबळ), समीर शरद सोनार (वय १९, रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंग रोड) व तुषार प्रदीप नारखेडे (वय १९, रा. यशवंत नगर) यांना फोन करून बोलावून घेतले होते. तेवढ्यात मुकेश सपकाळे तेथे आला. आपल्या भावाला मारहाण करत असल्याचे पाहून मुकेशने आवाराआवर करण्याचा प्रयत्न केला.

यातील संशयित आरोपी किरण हटकर यांने कमरेतून चॉपर काढून मुकेश सपकाळे याच्या छातीत खुपसला. त्यानंतर डोक्यावर वार करत खून केला. यात रोहित सपकाळे आणि किरण हटकर यांच्यात पुन्हा झटापटी झाली. किरणने राहितवर चॉपरचे दोन वार चुकविल्यानंतर सर्वजण शिरसोलीकडे पसार झाले. इकडे मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीन खासगी रिक्षाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी संशयितांपैकी इच्छाराम याला पारोळा येथून तर इतरांना पुण्यातून अटक केली होती. हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमुर्ती बी.एस.वावरे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.
खटल्यात एकुण ३० साक्षिदार तपासण्यात आले.त्यात मयताचा भाऊ रोहित सपकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवराज, पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष व पुराव्याअंती मुख्य आरोपी किरण हटकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी, नरेंद्र मोरे यांनी सहकार्य केले. आरोपींतर्फे ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here