बदली न केल्यास भाजयुमोतर्फे आंदोलनाचा इशारा
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची पक्षपाती कामगिरी आणि ठराविक राजकीय पदाधिकाऱ्यांना मानाची आणि अन्य पक्षांच्या लोकांना अपमानास्पद वागणुक मिळत असल्याबद्दल पाचोरा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश ठाकूर यांनी पाचोरा डीवायएसपी कार्यालयासमोर आंदोलन करून पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करण्याचे निवेदन दिले आहे.
सविस्तर असे की, पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार हे अनेक दिवसांपासून त्यांच्या पोलीस ठाणे हद्दीत राजकीय पक्षपाती धोरणाने कामकाज करीत आहेत. विविध सामाजिक वादविवाद व किरकोळ भांडण- तंटा प्रकरणी भाजपा पदाधिकारी समन्वयाची भुमिका घेतात. गावात किंवा समाजातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल्यावर सुध्दा आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्या कर्तव्य भावनेतून व सामाजिक उत्तरदायीत्व म्हणुन पोलीस ठाण्यात जाऊन शांततामय मार्गाने वादविवाद सोडविन्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याकडून भाजपा प्रणित पक्ष-संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळते. पोलीस निरीक्षक पवार यांच्याकडून भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ व अपशब्द बोलुन अपमानित करून हाकलणे, पक्ष पदाधिकाऱ्यांची प्रतिमामलीन करणारी आहे. आमच्या पक्ष संघटनेबद्दल अपप्रचार करणे असे उपद्व्याप हे अधिकारी करीत आहे.
निवेदनाच्या प्रति संबंधितांना रवाना
पाचोरा पोलीस ठाण्यात राजकीय लोकांना सन्मानाची वागणूक मिळावी, पोलीस निरीक्षकाने पक्षपाती प्रकार थांबवावा, विशिष्ट पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये. पक्षपातीपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ जिल्हा मुख्यालयात बदली करावी. जेणे करून समाजात शांतता व सुव्यवस्था कायम राहील. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मागण्यांना न्याय न दिल्यास संविधानात्मक मार्गाने लढा देण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रति राज्याचे गृहमंत्री, पोलीस महसंचालक मुंबई, नाशिक, जळगाव पोलीस अधीक्षक, पाचोरा डीवायएसपी यांना रवाना केल्या आहे. निवेदन देतांना भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.