सा. बां. मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय? संतप्त नागरिकांमधून उमटतोय सूर
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
शेंदुर्णी मार्गावरील पहुरजवळ जीवघेणे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थट्टा केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयापासून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत दोन किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुभाजकाचे कामही अपूर्णावस्थेत आहे. खरंतरचौपदरीकरणात संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ जिथे खड्डे आहे, तिथेच डांबरीकरण करून खड्डे बुजवत थट्टा केली जात आहे. जीवघेण्या खड्ड्यांमधील डांबरीकरण करण्यासाठी अत्यंत विलंब लागत असल्याने पहुर पोलीस ठाणे, आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात खड्डे चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त प्रश्न त्रस्त वाहनचालकांसह नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
सूचना फलकांचा पडला विसर…?
चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. खरंतर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावणे अत्यंत निकडीचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करावे, रस्त्याच्या दुतर्फा असणारी नाली पूर्ण करून स्थानिक रहिवाशांसह नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.