आमदार राजुमामा कर्तृत्वशून्य अन्‌‍ वृत्तीही संकुचित

0
2
साईमत जळगाव प्रतिनिधी

आमदार राजुमामा भोळे कर्तृत्वशून्य आहेतच अन्‌‍ त्यांची वृत्तीही संकुचित असल्याचे सांगत आज पत्रपरिषदेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते  व महापौर जयश्री महाजन यांचे पती सुनिल महाजन यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या आमदारकीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लावत त्यांचा आडमूठपणा उजागर करणारे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते  सुनिल महाजन पुढे म्हणाले की, स्वतःकाही करायचं नाही, फक्त कोणी काही  करत असेल तिथे े आडकाठी निर्माण करायची ; हेच काम मनापापसून करणारे आ. राजूमामा भोळे हे जिल्ह्यातील अन्य आमदारांपैकी  सर्वात कमी निधी आणणारे एकमेव आमदारठरले आहेत.सतत विकासकामात खोडा घालण्याचे काम आमदार राजूमामा भोळे यांनी केले आहे. जिल्ह्यात गिरीश महाजन व शहरात जयश्री महाजन काम करू देत नाहीत असे ते महणत असतील तर त्यांना या दोन्ही महाजनांची काय एलर्जी आहे ते त्यांनी नेमके सांगावे, असेही सुनील महाजन यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेनेचे सुनील ठाकूर, ललित धांडे, उमेश चौधरी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच सुनील महाजन यांनी आमदारांचा उल्लेख माजी आमदार राजू मामा भोळे असा केला यावर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की हा पायंडा आधीच्या विधानातून आमदार भोळे यांनी पाडला आहे. ते म्हणाले की, जयश्री महाजन यांचा कार्यकाल संपलेला नसतानाही त्यांचा माजी महापौर असा उल्लेख करत नवीन परंपरा सुरु केली आहे, आता ही  परंपरा पुढे सुरु राहील असे ते म्हणाले.  आजवर आमदार भोळे यांनी केवळ बाकडे बसवणे, हायमास्ट लॅम्प लावणे या व्यतिरिक्त कोणतेही ठोस मोठे काम केलेले नाही.

महापुरुषांच्या पुतळा अनावरणासंदर्भात ते म्हणाले की, हे आमदार शहराच्या विकासकामात कसा अडथळा निर्माण होईल यासाठी कायम कार्यरत होते त्यांनी शासनाने दिलेल्या पत्राच्या संदर्भातही सांगितलेे की, महापुरुषांच्या पुतळा अनावरणात राजकारण करायचे नव्हते तर शासनाचे स्थगितीचे पत्र आले कसे?, महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यावरही महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर राज्य शासनाकडून दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. ते पुढे म्हणाले की, तुमच्या अडीच वर्षाच्या महापालिकेच्या कार्यकाळात तुम्ही काय काम केले यावर उत्तर द्या; राज्यात, केंद्रात तसेच महानगरपालिकेत तुमची सत्ता होती, तुमच्या सौभाग्यवती महापौर होत्या मग विकास का झाला नाही ? असा सवालही त्यांनी केला.
शंभर कोटीच्या निधी संदर्भात ते म्हणाले की, हा शंभर कोटीचा बागुलबुवा पाच वर्षापासून सुरू असलेली ढोलकी आहे 2018 मध्ये या निधीला तत्वतः मान्यता मिळाली होती आजवर या निधीमधून फक्त नऊ कोटी रुपयाचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे. यामध्ये पाच कोटी रुपये मनपाच्या निधीमधून खर्च करून कामे करण्यात आली आहेत. उर्वरित निधीच्या संदर्भात आमदार महोदयांनी काय प्रयत्न केला?, त्याचा पाठपुरावा कोण करणार ? असा सवालही त्यांनी केला. जिल्हाभरातील आमदारांच्या तुलनेत जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सर्वात कमी निधी आणला आहे, असे निधी आणण्यास सक्षम नसलेले अकार्यक्षम आमदार ते असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

महानगरपालिका क्षेत्रात उत्तम दर्जा असलेली कामे झाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत मात्र शहरांमधील अनेक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यादेश देऊनही सुरुवात केलेली नाही या संदर्भात आपण काय  प्रयत्न केले आहे?, ही कामे का मार्गी लागली नाहीत?, असा सवालही महाजन यांनी केला.

सुनिल महाजन म्हणाले की, शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या महामार्गाबद्दल तसेच या मार्गाच्या दुरस्त्यांबद्दल आमदार महोदयांनी काय केले? आमदार साहेबांनी दहा वर्षातील आपल्या कारकिर्दीतील ठोस काम सांगावे , त्यांचा शिवतीर्थावर सत्कार करेल, असेही ते म्हणाले.
शहराच्या विकासासाठी आम्ही अनेक कामे हाती घेतली आहेत जवळपास 200 कोटींच्या कामाचे कार्यादेश झालेले आहेत आणि लवकरच ही कामे मार्गी लागतील महानगरपालिकेत काम करत असताना मिळालेला जो निधी आहे. तो निधी महाविकास आघाडीच्या कारकिर्दीतील म्हणजेच ठाकरे सरकारच्या काळातील निधी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
महानगरपालिकेला कर्जमुक्ती करण्याची बढाई मारणाऱ्या आमदारांनी सांगावे की कर्जमुक्ती करत असताना 250 कोटी पैकी महापालिकेच्या तिजोरीतील जवळपास 125 कोटी रुपये हूडकोला भरले गेले तसेच जिल्हा बँकेतील कर्ज भरतानाही महापालिकेच्या तिजोरीतीलच जळगावकरांच्या करांचा पैसा देण्यात आला . मग महापालिका कर्जमुक्त करण्याचे खोटे श्रेय घेण्याचा खटाटेोप ते का करीत आहेत ? हा आमचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले .
रेमंड कंपनीतील 25 मुलांना निलंबित करण्यात आले आहे या निलंबित तरुणांना न्याय मिळवून देऊन त्यांना तिथे मदत करा, बेरोजगारांचे प्रश्न सोडवा, जबाबदारीने वागा, नुसताच विरोधाला विरोध करू नका, असा सल्लाही त्यांनी आमदार भोळे यांना दिला.
महापौर जयश्री महाजन यांच्या विधानसभा लढवण्याच्या वक्तव्यावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हे आमदार साहेब आमदार नशिबाने आमदार झाले आहेत, कर्र्तृत्वाने नाही. या जळगाव शहराचे कर्र्तृत्वाने आमदार झालेले आमदार म्हणजे सुरेश दादा जैन आहेत. आम्ही आमच्या जीवनात संघर्षाने लोकप्रतिनिधी झालो . पुढेही संघर्ष करत राहू आणि जनताच ठरवणार की कुणाला घरी बसवायचे आहे.
सुनील महाजन यांनी शेवटी सांगितले की आमची निष्ठा ‘मातोश्री’ सोबत आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमचे नेते होते परंतु आता तो विषय संपलेला आहे. कामच करायचे नाही फक्त दूषण द्यायचे असा प्रघातच आमदार भोळे यांनी अगदी सुरूवातीपासून पाडलेला आहे, असा दणका देत सूनिल महाजन यांनी आज एकप्रकारे आमदार रामामा भोळ यांना खुले आव्हान दिल्याने पुढच्ंया राजकारणाचे वारे कसे वाहतील हे पाहणे महत्वचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here