निरंतर रुग्ण सेवा कायम सुरू राहण्याची दिली ग्वाही
साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :
पनवेल (मुंबई) येथील डोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले आर झुणझुणवाला ट्रस्टचे शंकरा आय हॉस्पिटलला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भेटीत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील गरजू रुग्णांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन कसे होते ? त्यांची राहण्यासह जेवणाची सोय कशी असते? त्याची माहिती जाणून घेतली.
गेल्या ९ महिन्यांपासून मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेकडो रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करवून त्यांना नवी दृष्टी दिली आहे. मतदारसंघात आपल्या नागरिकांचे आपण काही देणे लागतो, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सतत अशी रुग्ण सेवा करीत असतात. यानिमित्त हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी तेथील ट्रस्टी, व्यवस्थापक यंत्रणा, डॉक्टर मंडळी यांचे आभार मानले. अशीच निरंतर रुग्ण सेवा कायम सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. हॉस्पिटलसाठी वेळोवेळी सहकार्याची भावना व्यक्त केली. ही भावना व्यक्त करतांना मतदारसंघातील रुग्णांचे डोळे अक्षरशः पाणावले होते.
जीपीएस मित्र परिवाराचे सहकार्य
यावेळी हॉस्पिटलचे डॉ. राजेश कापसे, डॉ. प्राजक्ता परितेकर, डॉ. नारायण, डॉ. गिरीश बुधराणी, डॉ. प्रकाश पाटील, अश्विन पवार, डॉ. वसीम सैयद, डॉ. राहुल चौधरी, डॉ.ऋषिकेश झंवर आदी उपस्थित होते. अशा स्तुत्य उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस मित्र परिवार सहकार्य करीत आहे.



