विचार, भावना आणि कृतीच्या समन्वयासाठी मानसिक आरोग्य गरजेचे

0
54

साईमत जळगाव प्रतिनिधी

विचार, भावना आणि कृती ह्या एकमेकांशी बांधील आहेत आणि म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ह्या तिघांचा योग्य संगम साधणे गरजेचे आहे. सतर्क राहून भावना ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. आपण काय करीत आहोत? त्याचा परिणाम काय होणार आहे? ह्याचा सतत विचार केला पाहिजे. चांगले विचार ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, रोजच्या दिवसाचे योग्य ते व्यवस्थापन करणे आणि विश्वातील अदम्य अश्या शक्तीवर श्रद्धा ठेवणे हे भावनिक व्यवस्थापनासाठी आणि एकूणच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचे आहे, असा महत्वाचा सल्ला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कॉऊन्सेलर डॉ. प्रतिभा हरनखेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

के. सी. ई. सोसायटीच्या मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च जळगावच्या ‘बदलत्या युगातील मानसिक आरोग्य’ कार्यक्रमाद्वारे त्या विद्यार्थ्यांशी बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या जाणिवा करून दिल्या. शरीराला स्नान, बुद्धीला ज्ञान आणि मनाला ध्यान गरजेचे असते आणि ह्यातूनच मानसिक स्वास्थ टिकून ठेवायला मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असावा आणि सोबतच त्यांचे पाय जमिनीवर असावेत. आपल्या प्रत्येक गोष्टीचा आई वडील समाज ह्यावर काय परिणाम होईल आणि आपले भवितव्य काय असेल ह्याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. डॉ. हरनखेडकर ह्यांच्या बोलण्याचे समर्थन करीत त्या म्हणाल्या की, काही वेळा मुले अविचाराने वागतात, कुठलाही विचार न करता पळून जातात. अश्या तीन पालकांची परिस्थिती त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केली. अविचारामुळे काही काळ मुलामुलींना हे सर्व बरे वाटते पण पुढे काय? आपण केलेले प्रेम खरेच प्रेम आहे का? शिक्षण मध्येच सोडावे लागले तर करियर कसे होणार आहे? आयुष्याबद्दल पुढचे प्लॅनिंग काय? ह्याचे सर्वात भयंकर परिणाम मुलींवर होतात. हा सर्व प्रकार चालतो तो अविचार आणि मानसिक अनारोग्यामुळे म्हणूनच कुठलाही विचार करण्याअगोदर मानसिक आरोग्यावर काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमासाठी संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते व अश्या प्रकारच्या वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दीपाली पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here