वैद्यकीय : मनगटापासून वेगळा झालेला हाताचा पंजा प्लॅस्टीक सर्जरीने जोडला

0
16

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी

 

वैज्ञानिक चमत्काराने वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रगती झाली असली तरी मुंबई पुणे सारख्या शहराबाहेर या प्रगतीचा प्रवाह कधी आणि कसा पोहचेल हे सांगणे कठीण असले तरी रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कर्तव्य पार पाडणाऱ्या देवदूतांची प्रामाणिक इच्छाशक्ती शाबूत असेल तर असे चमत्कार जळगाव सारख्या शहरातही घडू शकतात, याचे जीवंत उदाहरण शिल्प हॉस्पीटलमध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या अत्यंत किचकट शस्रक्रीयेद्वारे प्लॅस्टीक सर्जन डॉ. श्रीराज महाजन यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.

शरातील शिल्प हॉस्पीटलमधील प्रमुख प्लॅस्टीक सर्जन तज्ज्ञ म्हणून कर्तव्य बजावत असलेले डॉ. श्रीराज महाजन यांनी काही दिवसांपुर्वीच अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रियेतून जाणारी शस्रक्रीया अगदी लिलया पार पाडून जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायात एक वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. डॉ. श्रीराज महाजन यांनी मनगटा पासून वेगळा झालेल्या हाताचा पंजा जोडून दुर्मिळ अशी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याने जळगावच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड ठरली आहे.

यासंदर्भात शिल्प हॉस्पीटलमधील सुत्रांशी साधलेल्या संवादानंतर प्राप्त झालेली माहीती अशी की, गेल्या महिन्यात 6 जुन रोजी पाचोऱ्याजवळ एक अपघात झाला होता. या अपघातात 35 वर्षीय तरूणाचा हाताचा पंजा वेगळा झाला होता. शरीरापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडणं ही कल्पना सामान्य नागरिक करुच शकत नाहीत. मात्र डॉक्टरांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य केली आहे. हात, हाताच्या नसा, स्नायू जोडणं आणि त्या हातावर नवी त्वचा बसवणं असे वरवर जरी शब्दात लिहिणं सोपे असले तरी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल 8 तास लागल्याचे डॉ. श्रीराज महाजन यांनी सांगितले.

मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नवीन नाही. मात्र जळगावात अशा प्रकारच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे स्थानिक पायाभूत सोयीसुविधा लक्षात घेता अत्यंत मोठे आव्हान होते. तथापी डॉ. श्रीराज महाजन यांनी हे आव्हान स्वीकारले आणि अत्यंत कौशल्याने ही किचकट शस्रक्रीया पुर्णत्वास नेली.

या शस्रक्रियेच्या यशामुळे शिल्प हॉस्पीटलमधील प्रमुख प्लॅस्टीक सर्जन डॉ. श्रीराज महाजन आणि त्यांचे सहकारी यांच्या वैद्यकीय जीवनात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय व त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना मुंबई इतकाच भरवशाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शरीरापासून वेगळा झालेला हाताचा पंजा डॉक्टरांनी पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला. वैद्यकीय इतिहासात अशी शस्त्रक्रिया क्वचितच घडते. वेळ, अपघातग्रस्त रुग्ण, या सगळ्यांची सांगड बांधत डॉक्टरांनी एका अपघात ग्रस्ताला नवजीवन दिले आहे.
या शस्त्रक्रियेविषयी डॉ. श्रीराज महाजन यांनी सांगितले की, पाचोऱ्याजवळ मोटरसायकलने जात असतांना एका 35 वर्षीय तरूणाचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या हाताचा पंजा हातापासून वेगळा झाला होता. अपघात झाल्यानंतर दोन तासात त्या जखमीस शिल्प हॉस्पीटलमधे आणले गेले. डॉ. श्रीराज महाजन यांनी अपघातग्रस्त तरुणावर लगेच उपचार सुरु केले. 8 तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तरुणाचा हाताचा पंजा पुन्हा हाताला जोडून दिला शिल्प हॉस्पीटलमधील प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीराज महाजन यांनी ही किमया केली. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत सुमारे 17 ते 18 बारीक अतिसुक्ष्म नसा तसेच रक्तवाहीन्या जोडण्याचे अतिशय कसबीचे काम डॉ. श्रीराज महाजन यांनी वेळेत पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासोबत अस्थिरोज तज्ज्ञ डॉ. सचिन खर्चे, डॉ.अनुज पाटील तर भूलरोग तज्ज्ञ डॉ. पुनम लढ्ढा यांच्यासह शिल्प हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. सदर तरुणावर 14 जून रोजी पुन्हा एकदा छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. महिनाभरात या तरुणाचा हात पूर्वीसारखा दिसू लागला असून आतमितीस त्याच्यावर फिजिओथेरपी सुरु असल्याचे डॉ.महाजन यांनी सांगितले.

शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागावर उपचार करण्यासाठी सुरुवातीस 6 तास महत्त्वाचे असतात. या सहा तासांना वैद्यकीय शास्त्रात गोल्डन अवर म्हणून संबोधले जाते. यासाठी अपघातानंतरचा  6 तासांचा कालावधी महत्वाचा असतो असे प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीराज महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले की, अंगठे, सिंगल बोटे जोडणे अशा शस्त्रक्रिया बऱ्याचदा करण्यात आल्या असून हाताचा पंजा जोडण्याची शस्त्रक्रिया जिल्ह्यात प्रथमच झाल्याचेही त्यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेत मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. त्यामुळे अत्यंत सावध व कुशलतेने ही शस्त्रक्रिया करावी लागते. दरम्यान, अपघातग्रस्तास गोल्डन अवरमध्ये जर रुग्णालयात आणून उपचार मिळाले तर शरीरारापासून वेगळे झालेले अवयव पूर्ववत जोडले जावू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here