शुद्ध पाण्यासाठी जळगाव महापालिकेत ‘ऑन-ग्राउंड अॅक्शन’ची नवी दिशा
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला गती देत महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रशासनाला नवा संदेश दिला आहे. भाऊंच्या उद्यान परिसरातील महाकाय जलकुंभाची पाहणी करताना त्यांनी थेट टाकीत उतरून स्वच्छता कामांचा सखोल आढावा घेतला. या अनोख्या आणि धाडसी पाहणीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
शहरवासीयांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने महानगरपालिकेकडून जलकुंभ स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत भाऊंच्या उद्यानातील सुमारे १०० फूट उंच आणि २८ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महापौर काळे यांनी निसरड्या शिडीवरून टाकीत उतरून कामाची गुणवत्ता तपासली.
या पाहणीवेळी नगरसेवक नितीन बरडे, रितिक ढेकळे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या या थेट सहभागामुळे अधिकाऱ्यांमध्येही तत्परता दिसून आली.
टाकीच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमछाक करणाऱ्या परिस्थितीत काम करताना पाहून महापौर भावूक झाल्या. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. “शहरासाठी इतक्या कठीण परिस्थितीत काम करणारे कर्मचारीच खरे हिरो आहेत,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्व तयारीला वेग देण्यात आला असून आतापर्यंत शहरातील तीन जलकुंभांची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा अशाच प्रकारची व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली.
महापौरांच्या या ‘ऑन-ग्राउंड’ आणि प्रत्यक्ष कामाच्या पाहणीमुळे महापालिका प्रशासनात पारदर्शकता वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच जळगावकरांमध्ये त्यांच्या सक्रिय आणि थेट काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक होत आहे.
