मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन लवकरच संपणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची असलेली ‘सगे सोयऱ्यां’ची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही.राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत की काय, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
कायदेतज्ञांकडून घेतला सल्ला
मनोज जरांगे यांच्या १०० टक्के मागण्या पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन संपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता कुणबी नोंद आढळल्यास मराठा समाजातील सोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. विधी विभागाचे सचिव कायदेतज्ञांना बोलवून सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही.
सरकारचे शिष्टमंडळ
जरांगेंची भेट घेणार
सरकारचे शिष्टमंंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे भेट घेणार आहे. काल जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि नंतर नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट घेऊन दोघे जण आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीच्या पूर्णत्वाला अंतिम स्वरुप देण्यासाठीची योजना आखली आहे.
समाधानकारक तोडगा : बच्चू कडू
सरकारला ‘सगेसोयरे’वर समाधानकारक तोडगा मिळाला. मराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत काल मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यावर चर्चा झाली. सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली आणि त्यातून एक समाधानकारक तोडगा आम्ही आणला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. या तोडग्यामुळे जरांगे यांचे समाधान होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.