साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात हजारो लहान-मोठ्या माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपन्यांमधील दूषित आणि विषारी पाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट तलावात सोडल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांनी केला आहे. या प्रदूषणामुळे तलावातील तब्बल एक टन मासे मृत पावले असून, शासनमान्य आदिवासी मत्स्यमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलावाच्या काठावर मृत माशांचा खच!
मन्यारखेडा तलावामध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर विषारी रसायने मिसळली गेली. या केमिकलयुक्त पाण्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी खालावली आणि लहान-मोठ्या सर्वच माशांचा गुदमरून मृत्यू झाला. सद्यस्थितीत तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग साचला असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
’त्या’ कंपन्यांवर कारवाई करा; मच्छीमारांची मागणी
”एमआयडीसीतील काही कंपन्या नियमांचे उल्लंघन करून कंपन्यांमधील घातक रसायनयुक्त पाणी थेट मन्यारखेडा तलावात सोडत आहेत. या बेजबाबदारपणामुळे आमच्या हक्काचा रोजगार हिरावला गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाने तातडीने या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी आदिवासी मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
२०१८ पासून पाठपुरावा, तरीही प्रशासन सुस्त!
या गंभीर समस्येबाबत आदिवासी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सैंदाणे यांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की,
”तलावातील केमिकल युक्त पाण्याबाबत आम्ही २०१८ पासून सातत्याने शासकीय दरबारी पाठपुरावा करत आहोत. परंतु, प्रशासनाच्या वतीने आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या याच ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी या तलावात मासे मरतात आणि आम्हा गरीब मच्छीमारांचे अतोनात नुकसान होते.”
या दुर्घटनेमुळे स्थानिक आदिवासी मच्छीमार बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आता तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोषी केमिकल कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
