वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन
साईमत/न्यूज नेटवर्क/जामनेर :
तालुक्यातील मोयगाव – पिंपळगाव रस्त्याला लागून माळरानावर महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोयगाव व पिंपळगाव गोलाईत गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आई भवानी ‘देवराई’ आकारास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आई भवानी ‘देवराई’प्रमाणे अनेक ‘देवराया’ निर्माण व्हाव्यात, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते येथील परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या क्षेत्रात गेल्या ४ जुलै रोजी पहिल्या टप्प्यात एक हजार रोपे लावण्यात आली होती तर रविवारी, २८ जुलै रोजी पुन्हा एक हजार रोपे लावण्यात आली. सकाळपासूनच वृक्षप्रेमींचा मोठा जनसमुदाय वृक्ष लागवडीत व्यस्त होता. ग्रामस्थांच्या श्रमदानाने सकाळी १२ वाजताच हजार रोपे लावून झाली.
याप्रसंगी जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे प. पू. श्याम चैतन्य महाराज, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, पहूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदीप लोढा, जामनेर वनीकरण विभागाचे आरएफओ समाधान पाटील, वनपाल देवीदास जाधव, मोयगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रा. महेंद्रसिंह कच्छवाह, पिंपळगाव गोलाईतच्या सरपंच उषा सिसोदिया तसेच दोन्ही गावातील आबालवृद्ध, जामनेर येथील महाराणा प्रतापसिंह उत्सव समितीचे सदस्य, राजपुताना महिला ग्रुप जामनेरच्या सर्व सदस्या आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाने ‘देवराया’साठी प्रोत्साहन द्यावे
ते पुढे म्हणाले की, वृक्षप्रेमी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ झाडे लावून चालणार नाही तर ती आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जगविली पाहिजे. आई भवानी देवराईचा आदर्श घेऊन जिल्ह्यात अनेक ठिकाणी देवराया निर्माण व्हाव्यात, शासनाने त्याला प्रोत्साहन द्यावे, त्यासाठी वनविभागाने काळजी घ्यावी, अशीही अपेक्षा महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केली. यावेळी शौर्यासिंह सूरजसिंह राजपूत हिला दिल्ली येथे नुकताच किड्स सुपरस्टार पुरस्कार मिळाला होता. याबद्दल तिचा तिच्यासह पालकांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
‘देवराई’च्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
केळी तज्ज्ञ डॉ. के.बी.पाटील यांनी जल, जमीन यांचे व्यवस्थापन पाश्चात्य देशात कसे केले जाते हे समजावून सांगत ते निसर्ग वैभव जपले पाहिजे, असे मत व्यक्त करत ‘देवराई’च्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी आरएफओ समाधान पाटील, प्रा. डी.एस.पाटील, कैलाससिंह जाधव, डॉ. राजेंद्रसिंह आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालनात डॉ. विश्वजीत सिसोदिया (वसुंधरा फाउंडेशन) यांनी ‘देवराई’ ही संकल्पना वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. त्यासाठी आपले पूर्वज वृक्षांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



