रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती करून यशस्वी करा

0
39

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा हे केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा. रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान ही लोक चळवळ निर्माण करून जास्तीत जास्त जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करा. रस्ता सप्ताह हा फक्त सात दिवसांसाठीचा सप्ताह नसून जीवन सप्ताह आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी, १५ जानेवारी रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, उप प्रादेशकि परिवहन अधिकारी श्‍याम लोही, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, एसटी विभागाचे नियंत्रक भगवान जगनोर आदी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १० लाखांचा निधी वितरित करण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सेल्फी पॉर्इंट, रस्ते विषयक नियम फलकांचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक आहे. रस्ता सुरक्षा म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे. सहा ते सातपेक्षा जास्त वाहन चालविण्यात येऊ नये. महसूल विभागानंतर परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान व डिजिटलचा वापर केला. परिवहन विभागाने सर्व परवाने ऑनलाईन केले आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता व गतिमानता आली आहे. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले की, रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्याचे काम पोलीस व परिवहन विभाग करत आहे. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने वाहतुकीचे नियम पाळावेत. प्रास्ताविक श्‍याम लोही तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचा रिक्षातून प्रवास

रस्ता सुरक्षा अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शहरातील ७ गुलाबी रिक्षा महिला चालकांना तीळगुळ वाटप करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर महिला चालकांच्या एका गुलाबी रिक्षेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोबत प्रवास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here