रुक्मिणी नगर ते वाघ नगर पट्ट्यात संध्याकाळनंतर असुरक्षिततेचे सावट; नागरिकांची कडक कारवाईची मागणी
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरातील वाघ नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा वाढता धिंगाणा नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः संध्याकाळनंतर या भागात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असून रुक्मिणी नगर ते वाघ नगर या दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना, व्यावसायिकांना तसेच महिला व मुलींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्री साई डेअरीजवळ सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत काही टवाळखोर तरुणांचा अड्डा तयार होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी मोठमोठ्याने गोंधळ घालणे, दुचाकी रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. परिणामी स्थानिक व्यावसायिकांचे कामकाज बाधित होत असून रहिवाशांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे या टवाळखोरांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला व मुलींवर अश्लील टिप्पण्या, छेडछाड आणि शिवीगाळ केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अनेक महिला भीतीपोटी खाली मान घालून या परिसरातून जाताना दिसतात. परिसरातील कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून रात्री बाहेर पडणे टाळले जात आहे.
नागरिकांनी या प्रकारांबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनेकदा निवेदने देऊन तसेच दूरध्वनीद्वारे तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. टवाळखोरांकडून मोबाईलवर गेम खेळणे, सिगारेट ओढणे, अश्लील हावभाव करणे व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ वर्तन करणे असे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी वाघ नगर स्टॉप परिसरात दोन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्याने नागरिक आधीच भयभीत आहेत. त्यातच सध्याच्या टवाळखोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. श्री साई डेअरीजवळ अनेकदा वाद, भांडणे आणि मारामारी होत असल्याचेही समोर आले आहे. तरीदेखील पोलीस प्रशासनाकडून नियमित गस्त किंवा कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर वाघ नगर परिसरातील नागरिकांनी टवाळखोरांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासन आता या गंभीर प्रकारांकडे किती गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
