साईमत, धुळे, प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. याद्वारे शेती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. सध्या निवडणूक लढविण्याचा विचार नाही.
मात्र, पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल, असे नाशिक परिक्षेत्राचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता.3) पत्रकार परिषदेत सांगितले. श्री.दिघावकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करीत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपत प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. धुळे लोकसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी समस्या आहे.
शेतकऱ्यांचे भाग्य सिंचनामुळे पलटू शकते. पश्चिम वाहिनी नद्या, नदीजोड प्रकल्प, नार- पार प्रकल्प यातून जलऑडिट करायचे ठरविले आहे. नार-पार प्रकल्पाची 1956 पासून चर्चा आहे.
या प्रकल्पातील पाणी धुळ्याला मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. खान्देशच्या हक्काच्या पाण्यासाठी योग्य व्यासपीठावर लढा दिला जाईल. रोजगारासह धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील समस्या जवळून पाहिल्या आहेत. विदेशात संधी मिळाली, तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
राज्य शासनाने अनेक पुरस्कारांनी माझा गौरव केला आहे. युवक, शेतकरी व महिला सक्षमीकरणावर कार्यात भर आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार आहे. बागलाण तालुक्यात 20 सिमेंट बंधारे बांधले आहेत. 40 सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत. शेतमालाला भाव मिळावा ही आग्रही मागणी आहे. सध्या पावसाअभावी राज्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीअंती पॅकेजची मागणी करणार असल्याचेही श्री.दिघावकर म्हणाले.



