साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
शेत शिवारात विजेचा लपंडाव होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा नियमित सुरू व्हावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी वीज अभियंत्यांचे कार्यालय गाठून निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी अभियंता सुरेश चौधरी यांनी लवकरच नाचणखेडा फिडर दोन भागात सुरू करणार असून शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मे महिन्यात उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे तापमान ४० ते ४७ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याने शेतातील पीके सुकत चालली आहेत. त्यातच विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना वेळेत देता येत नसल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेत शिवारातील वीजपुरवठा नियमित सुरू व्हावा, या मागणीसाठी सहाय्यक अभियंता सुरेश चौधरी यांना संतप्त शेतकऱ्यांनी लेखी निवेदन दिले. यावेळी सुरेश घोंगडे, तुषार बनकर, विष्णू घोंगडे आदी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला.
निवेदनावर सुरेश घोंगडे, तुषार बनकर, विष्णू घोंगडे, संतोष घोंगडे, सतीश कुमावत, राजधर घोंगडे, विलास लहासे, राहुल बावस्कर, जितेंद्र घोंगडे, हेमंत जाधव, अर्जुन घोंगडे, संजय सूर्यवंशी, गजानन चौधरी, शुभम घोंगडे, सुशील घोंगडे, रमेश घोंगडे, अविनाश राऊत, अतुल जाधव आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.