Slogan In Dhule District: ‘मुलांना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊ या’चा धुळे जिल्ह्यात जयघोष

0
10

मान्यवरांच्या उपस्थितीत झाला नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

‘मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊया, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाऐंगे, स्कूल जरुर जाऐंगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो’ च्या जयघोषात नवागत विद्यार्थ्यांचा, कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवूणक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी साजरा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत धुळे तालुक्यातील तिखी येथे नवागत विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास तहसीलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी भारती भामरे, सरपंच कविता पाटील, विस्तार अधिकारी (शिक्षण) सतिलाल कोळी, मुख्याध्यापिका ललीता बोरसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब बेलदार यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षांची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, तिखी येथे इयत्ता पहिलीतील २४ नवागत विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव सोहळा झाला. श्रीमती विसपुते यांनी नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गणवेश, एक जोडी बूट, मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पहिले पाऊल वर्गात टाकून विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला. ‘एक पेड मॉ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय किचनला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. प्रवेशोत्सवापूर्वी नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक कल्पना चौधरी, मनिषा केदार, कृष्णाबाई पाटील, कविता खैरनार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक विलास पाटील, सूत्रसंचलन दर्पण देसले तर मुख्याध्यापिका भारती भामरे यांनी आभार मानले.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची लाभली उपस्थिती

शासनाच्या शिक्षण विभागामार्फत धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरावर मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळेत विद्यार्थ्यांचे रांगोळी, तोरण, पुष्पवर्षाव, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, वृक्षारोपण करण्यात आले. समारंभपूर्वक स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसून येत होता. यावेळी साक्री तालुक्यातील दातर्ती येथे आ.मंजुळा गावित, शिरपूर तालुक्यातील भोईटी येथे आ.काशिराम पावरा, शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील उद्योगपती सरकार साहेब रावल तर हेंद्रुण येथे पोलीस उपअधीक्षक शिल्पा पाटील यांनी शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here