आमदार मंजुळाताई गावित यांची ग्वाही
साईमत/साक्री, जि.धुळे/प्रतिनिधी
स्टॅम्पवेंडर व्यवसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही साक्रीच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी स्टॅम्पवेंडर संघटनेला दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता, अर्ज व दस्त लेखक संघटना नाशिक विभाग यांच्यावतीने साक्री तालुका स्टॅम्प वेंडर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार गावित यांच्याशी त्यांच्या धुळे येथील निवासस्थानी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी आमदार यांनी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. राज्य शासनाने गेल्या जून महिन्यात मयत स्टॅम्प वेंडरांच्या वारसांना परवाने देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु मयत स्टॅम्प वेंडर यांच्यासोबत वयोवृद्ध गंभीर आजारी आणि अपंग स्टॅम्पवेंडरांच्या वारसांना त्यांच्या हयातीतच परवाने देण्यात यावेत, याबाबत झालेल्या शासन निर्णयात योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
स्टॅम्प विक्रीमध्ये दहा टक्के कमिशन सर्व प्रकारचे शासकीय कार्यालय तहसील व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच दुय्यम निबंधक सहाय्यक जिल्हा निबंधक कार्यालयांमध्ये बसण्यास जागा उपलब्ध करून द्यावी, येणाऱ्या पक्षकारांसाठी सुद्धा बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून नागरिक व शासन यांच्यात एक सुसंवाद निर्माण होईल व नागरिकांची शासकीय कामे सुखर होतील, नागरिकांच्या मनात शासनाविषयी आपुलकी निर्माण होईल अशाही मागण्या आमदार यांना दिलेल्या निवेदनात संघटनेतर्फे केले आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद ओझरकर, राज्य कार्याकारिणी सदस्य तथा साक्री तालुका स्टॅम्प वेंडर संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, ज्येष्ठ सदस्य बी.एम.वाळेकर तथा ताहीर बेग मिर्झा यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.