जळगावात पत्र्याची घरे १० अंशांनी थंड होणार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम म्हणून सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’ प्रकल्पाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. मंगळवारी महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे पत्र्याच्या घरांतील तापमान तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घटत असल्याचे प्रत्यक्ष चाचणीत स्पष्ट झाले आहे.
निसर्गाधारित उपायातून उष्णतेवर नियंत्रण
“महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्गाधारित उपाय” या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील गरीब व मध्यमवर्गीय वस्त्यांतील पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा दुहेरी थर दिला जात आहे. हा विशेष रंग सूर्यकिरण परावर्तित करून छत गरम होण्यापासून वाचवतो, त्यामुळे घरातील तापमान लक्षणीयरीत्या घटते.
४०० घरांचा समावेश; चार भागांत अंमलबजावणी
हा उपक्रम संयुक्त विद्यमाने राबवला जात असून यातमहानगरपालिका, ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट प्रॅक्टिकल ॲक्शन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था सहभागी आहेत.
या प्रकल्पासाठी समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी आणि पिंप्राळा हुडको या भागांतील प्रत्येकी १०० अशी एकूण ४०० घरे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ३०० चौ. फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेली पत्र्याची तसेच लहान काँक्रीट घरे समाविष्ट आहेत.
प्रत्यक्ष पाहणीत १० अंशांचा फरक सिद्ध
उद्घाटनावेळी महापौर दीपमाला काळे यांनी अधिकारी व तज्ज्ञांसोबत काही घरांची प्रत्यक्ष पाहणी करून तापमान मोजणी केली. रंग लावलेल्या आणि न लावलेल्या घरांमध्ये तब्बल १० अंश सेल्सिअसचा फरक आढळून आला. या परिणामकारकतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नागरिकांना मोठा दिलासा मिळणार
या उपक्रमामुळे उष्णतेच्या झळा कमी होण्यासोबतच वीज बचतीलाही मोठी मदत होणार आहे. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केले.
“वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा उपक्रम त्यांना थेट दिलासा देणारा आहे आणि भविष्यात याची व्याप्ती आणखी वाढवली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
शहरासाठी पर्यावरणपूरक पाऊल
उष्णतेच्या तीव्रतेवर मात करण्यासाठी राबवलेला हा प्रकल्प शहरासाठी पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाय ठरत असून, इतर शहरांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
