साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरालगतच्या एल. के. फार्म हाऊसवरील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मागील तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना महापालिका निवडणूक लढविण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे व आवश्यक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना जळगाव जिल्हा कारागृहात तात्पुरते स्थलांतर करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या राजकारणात नवा रंग भरण्याची चिन्हे दिसत आहेत.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
सध्या नाशिक कारागृहात असलेल्या ललित कोल्हे यांच्यावतीने अॅड. सागर चित्रे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश निकम यांनी कोल्हे यांना २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत जळगाव जिल्हा कारागृहात तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.
उमेदवारी प्रक्रियेस मुभा
या आदेशानुसार ललित कोल्हे यांना या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, निवडणुकीशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच इतर प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. त्यांच्या वकिलांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
माजी महापौर असलेल्या ललित कोल्हे यांचे जळगाव शहराच्या राजकारणात स्वतंत्र स्थान आहे. बोगस कॉल सेंटर प्रकरणामुळे ते अटकेत असले तरी न्यायालयाच्या या आदेशामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांचा सहभाग कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवून आणेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वकिलांचा विश्वास
यासंदर्भात माजी महापौर ललित कोल्हे यांचे वकील अॅड. सागर चित्रे यांनी सांगितले की, “निवडणूक लढविणे हा मूलभूत अधिकार आहे. न्यायालयाने हा अधिकार मान्य करून कोल्हे यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली आहे.”
एकूणच, न्यायालयाच्या या निर्णयामुळे बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेल्या ललित कोल्हे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
