वरणगाव : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात दंत व नेत्ररोग अशा दोन डॉक्टरांची वर्षभरापासून रुग्णांना उणीव जाणवत आहे. त्यामुळे दंत व नेत्ररोग डॉक्टरांअभावी गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील आरोग्य विभागाला जागृत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वरणगाव शहर व परिसरातील खेड्यांमधील गरजू रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. सुसज्ज इमारतीसह रुग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये नेत्ररोग व दंतरोग विभागाचाही समावेश आहे. इमारतीत त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केले आहेत. त्यामुळे इतर रुग्णांप्रमाणेच नेत्र व दंताचे विकार असलेल्या रुग्णांनाही दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून नेत्ररोग व दंतरोग तज्ञांची जागा रिक्त असल्याने नेत्र व दंतरोग विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांची उणीव जाणवत आहे. त्यांना रुग्णालयातून उपचाराअभावी माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यामध्ये सर्वाधिक वयोवृद्ध रुग्णांचा समावेश आहे. त्यांना शासनाच्या मोफत उपचाराअभावी नाहकचा आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे.
पाच महिन्यांपासून
प्रस्ताव धुळखात पडून
गरजू रुग्णांना शासनाच्या आरोग्य विभागाने मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मोफतच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचीच कमतरता असल्याने उपचार तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेअभावी रुग्णांना वंचित रहावे लागत आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेत्र व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नाराजीला रुग्णालयातील इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाने पाच महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे नेत्र व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करून मिळावी, अशा मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे धूळखात पडून आहे. त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली
आहे.
रुग्णकल्याण समितीने
पुढाकार घेण्याची गरज
रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयालगतच सुविधायुक्त सुसज्ज असे निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, असे असुनही रुग्णालयात नेत्र व दंतरोग तसेच इतर डॉक्टर येण्यास नकार देत असण्यामागचे कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णकल्याण समितीने याबाबतीत पुढाकार घेऊन रुग्ण व रुग्ण सेवा देणारे डॉक्टर तसेच कर्मचारी यांच्या अडीअडचणींची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास रुग्णांना अत्यावश्यक सेवा एका छताखाली मिळण्यास मदत होईल. त्यामुळे वरणगाव व परिसरातील रुग्णांना दिलासा मिळेल, यासाठी रुग्णकल्याण समितीने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती
वैद्यकीय अधिकारी ३, परिचारिका ७, लिपीक ३ (वरिष्ठ लिपीक एक जागा रिक्त), एक्स रे टेक्नीशियन १, लॅब टेक्नीशियन २ (एक सहाय्यक ), फार्मासिस्ट १ , शिपाई १ , चालक १, वार्डबॉय ४, स्वच्छता कर्मचारी २ अशी सद्यस्थितीला कर्मचाऱ्यांची
स्थिती आहे.
पाठपुरावा करुन रुग्णांची गैरसोय दूर करणार
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा सुरू असतो. नेत्र व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी केली आहे. याबाबत पुन्हा तातडीने पाठपुरावा करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
-सुनील काळे (माजी नगराध्यक्ष
तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष)