साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर
संपूर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे ‘भोंगऱ्या’ आहे. वर्षभर काबाड कष्ट करुन भोंगऱ्या सणानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या तीन जिल्ह्यातील आदिवासी बांधव या सणानिमित्त एकत्र येतात. वाड्या-वस्त्यांवर तरुण-तरुणीसह आबाद वृध्द ढोल-ताशांच्या तालावर, बासरीच्या सुरांनी धुंद होऊन ‘भोंगऱ्या आया रे भाया, चालु, चालू रे भोंगऱ्या देखांन चालु’, अशी लोकगीते सादर करतात आणि भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. अशा खान्देशी, आदिवासी बांधवाच्या ‘भोंगऱ्या’ सणास सोमवारी, १८ मार्चपासून प्रारंभ होत आहे.
आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत आवडता व मन उत्साहात करणारा सण म्हणजे ‘भोंगऱ्या’ आहे. दिवाळीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच आदिवासी बांधवामध्ये ‘भोंगऱ्या’ सणास महत्त्व असते. हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यांसह बाहेरगावी राहत असलेले पावरा बांधव एकत्र येतात. हा सण जल्लोषात साजरा करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात पावरा बांधव कुंड्या पाणी, धानोरा, अडावद येथे एकत्र येणार आहे. भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार असून त्यामुळे वैभवशाली सातपुड्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
असा साजरा करतात ‘भोंगऱ्या’ सण
सर्व वाड्या वस्त्यावरुन ढोल, घेऊन आलेले आदिवासी पावरा बांधव सकाळी समाजाचे पाटील यांच्या घरी येवून गिणचरी देवीची व ढोल यांची पूजा करुन फेर घेऊन नृत्य करतात. या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. तालुक्यात अनेक पाड्या, वस्त्यांवर भोंगऱ्या साजरा होत असल्याने त्याच्यासाठी लागणाऱ्या खाद्य वस्तु आणि खरेदीसाठी गजबज सुरु आहे. भोंगऱ्यानिमित्त आलेल्या नातेवाईकांना व इष्ट मित्रमंडळींना भोंगऱ्याची मिठाई म्हणून हार, कंगण, गोडशेव, फुटाणे, जिलेबी आदी खाद्य पदार्थ भेट म्हणून देतात. या सणाला मुली आपल्या माहेरी आलेल्या नातेवाईकांना जेवण म्हणून तुपामध्ये शेवया, गुळ असे जेवण देतात. होळीपर्यंत चालणारा हा सण होळीनंतर दुसऱ्या दिवशी मांसाहाराचा स्वाद घेऊन मन उत्साहित करणारा आनंद लुटतात.
‘भोंगऱ्या’ सणाविषयी समज-गैरसमज
आदिवासी बांधवाच्या या सणाविषयी बहुतेक आपल्या लोकांमध्ये भोंगऱ्या दिवसात आदिवासी मुले-मुलींना पळवून नेतात, लग्न करतात हा चुकीचा गैरसमज आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या मागील महिन्याची पौर्णिमा ते येणाऱ्या होळीची पौर्णिमा या कालावधीला आदिवासी बांधवामध्ये ‘तांडणपोह’ म्हणजे ‘तांड्याचा महिना’ असे म्हटले जाते. त्यामुळे या कालावधीत महिनाभर कुणीही साखरपुडा विवाह किंवा पळवून नेणे ह्या प्रकारास आदिवासी पावरा समाज अशुभ मानतात. म्हणून वरील हा गैरसमज आहे. एखाद्या वेळेस हा प्रकार घडला तर संस्कृती मोडली. त्यामुळे आदिवासींची जातपंचायत दंडवसूल करतात. त्याबरोबर सामाजिक संघटना कार्यवाहीही करतात.
असा असतो आदिवासींचा पेहराव
या सणाला आदिवासी महिलांकडे जेवढे दागिने असतात, तेवढे परिधान करून श्रृंगार करून भोंगऱ्यामध्ये नाच करीत मंत्रमुग्ध होतात. मोठमोठे ढोल घेवून कमरेला करदोडा (चांदीचा) बांधवाबा जुबंध, वाकला, पिंजण्या असा महिलांचा पेहराव असतो. धोती, टोपी, कुडता, कोट, रंगबिरंगी चष्मे असा पुरुषांचा पेहराव असतो. अश्या रितीने संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येवून गतशाली वैभव प्राप्त सातपुडा पर्वताला उत्साहित करुन टाकतात. यावर्षी नवीन उमर्टी याठिकाणी मोठा भोंगऱ्या बाजार भरणार असल्याचेही समजते.
असा भरणार भोंगऱ्या बाजार
सोमवारी, १८ मार्च रोजी अडावद, उनपदेव पांढरी, मंगळवारी, १९ मार्च रोजी किनगाव, वरगव्हाण, नव्यानेच उमर्टी या गावात, तर बुधवारी, २० मार्च रोजी शेवरे, शिरवेल, धवली, गुरुवारी, २१ मार्च रोजी धानोरा, मध्य प्रदेशमधील बलवाडी, शुक्रवारी, २२ मार्च रोजी यावल, मध्यप्रदेशातील वरला, शनिवारी, २३ मार्च रोजी वाघझिरा, वैजापूर, रविवारी घुमावल तावसे, कर्जाना, कुंड्यापाणी, चोपडा, आदी ठिकाणी भोंगऱ्या बाजार भरणार आहे. या सणामुळे खान्देशातील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत आहे.