साईमत, प्रतिनिधी, जळगाव
स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सोमवारी येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील 224 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कालखंडात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श ठेवत तरूणांनी देशसेवेसाठी पुढे यावे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे आज आपण मुक्तपणाने जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांच्या जिल्हापातळीवरील तक्रारींची निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चोपडा येथील स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल छोटालाल गुजराथी यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण केल्याबाबत त्यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, ट्रॉफी व शाल देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते जागेवर जाऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना प्रकृतीच्या कारणास्तव व्यासपीठावर उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी जागेवर जाऊन सन्मान केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, लिपिक अनिल पठाडे, दिनकर मराठे, चंद्रकांत कुंभार, प्रेमराज वाघ, राजश्री पाचपोळ, जिज्ञा भारंबे, मनिषा राजपूत, सुमती मनोरे व स्मिता महाजन यांनी परिश्रम घेतले.