आता होणार का ? जळगाव मनपात सत्तांतर

0
30

जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्तांतर होणार आहे. यानंतर जळगाव महापालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत आहेत. सध्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, यात शिवसेनेचे बनखोर नेते एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे.

याआधी जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, शिवसेना नेतृत्वावर विश्‍वास ठेवत महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि सत्तेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली.

जळगाव महापालिकेत सत्तातंर करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले होते. भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी या नगरसेवकांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मतदानासाठी हे बंडखोर नगरसेवक जळगावात आले आणि त्यांनी शिवसेनेला मतदान केले. शिवसेनेचे महापौर झाले आणि महापालिकेवर भगवा फडकला.

अपात्रतेची सुनावणी

महापालिकेत शिवसेनेला साथ देणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करा, अशी तक्रार भाजपाने नाशिक विभागीय आयुक्ताकडे दिली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे राज्याचे नगरविकामंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे लक्ष होते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांना कारवाईपासून वाचण्याची आशा होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेत बंडखोरी केली. राज्यातील सत्तेत ते भाजपासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. जळगाव महापालिकेतील फुटीर नगरसेवकांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. शिंदे त्यांचे ऐकून घेत होते. त्यांना विकासासाठी निधीही देत होते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांसमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्‍न उभा राहणार आहे.

नगरसेवक शिंदेसोबत जाणार?

राज्यात भाजपा व शिवसेना बंडखोरांचे सरकार येणार असल्याने जळगाव महापालिकेतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. फुटीर नगरसेवक शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या तरी याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. दरम्यान, शिवाय शिंदे यांचा शिवसेना गट भाजपासोबत असल्यामुळे भाजपा या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठीची तक्रार मागे घेण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here