साईमत जळगाव प्रतिनिधी
आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने शुक्रवारी जळगाव शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमोदा गावातील महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची झालेली विटंबना या घटनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज तीर्थ (शिवतीर्थ मैदान) येथून सुरू झालेला हा मोर्चा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात समाजातील मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि युवक सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे आमोदा गावात असलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, संबंधित समाजकंटकावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामध्ये घटनेचा निषेध नोंदवत दोषींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समाजातील विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर योग्य ती कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
दरम्यान, या मोर्चामुळे शहरातील काही भागात वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
एकूणच, या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
