जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या 64 वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत वृद्धाची ओळख जीवन पाथरे उर्फ जीवन मिस्त्री (वय 64) अशी झाली आहे. प्राथमिक तपासात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन संशयितांनी जीवन मिस्त्री यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी बेदम मारहाण करून त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अमानुष हत्येमुळे जळगाव शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
