पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण
साईमत/जळगाव /प्रतिनिधी :
मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७०९.२८० किलोग्रॅम गांजा आज, २४ डिसेंबर रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’ स्थापन करण्यात आली होती.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या उपस्थितीत जप्त मुद्देमालाच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर दोन शासकीय पंचांसमक्ष आणि सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या देखरेखीखाली खड्डा खोदून हा सर्व गांजा नष्ट करण्यात आला. पारदर्शकतेसाठी या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.
ही महत्त्वाची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय दोरकर, संदीप पाटील, सुनील दामोदरे, संदीप चव्हाण, जयंत चौधरी, राहुल बैसाने, रवींद्र चौधरी, नीता राजपूत आणि चालक दर्शन ढाकणे या पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. तसेच वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांची उपस्थिती होती.
