साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव महापालिकेची तब्बल ४१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात फौजदारी स्वरूपाची कारवाई करून कंपनी व तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नगरसेवक देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९९७ मध्ये जळगाव शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका स्वरूपात देण्यात आले होते. मात्र संबंधित कंपनीने प्रत्यक्ष काम न करता महापालिकेकडून घेतलेली अनामत रक्कम सुमारे ४ कोटी रुपये परत न करता स्वतःकडेच ठेवली, असा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, ही ४ कोटी रुपयांची रक्कम २००२ पासून आजपर्यंत म्हणजे सुमारे २४ वर्षे महापालिकेकडे परत आलेली नाही. या कालावधीत दरवर्षी ९ टक्के चक्रवाढ व्याजदराने गणना केल्यास मूळ रक्कम व व्याज मिळून सुमारे ४१ कोटी ३४ लाख रुपयांचे महापालिकेला आर्थिक नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी व तिच्या संचालकांवर फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहार केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अरविंद देशमुख यांनी पोलिसांकडे सादर केलेल्या तक्रारीत केली आहे.
या तक्रारीनंतर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, प्रशासन व पोलीस यंत्रणा यावर पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
