साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत कथित भेदभाव होत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे.
खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
स्थानिकांवर कारवाई, परप्रांतीयांना मोकळीक?
याउलट, स्थानिक मराठी तरुण उपजीविकेसाठी छोटे व्यवसाय करत असताना त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई होत असल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात आहेत का?” असा थेट सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
हॉकर्स झोनची मागणी
या पार्श्वभूमीवर मनसेने शहरात नियोजित व कायदेशीर हॉकर्स झोन तातडीने निश्चित करण्याची मागणी केली आहे. लघु व्यावसायिकांना योग्य जागा, मूलभूत सुविधा आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी हॉकर्स नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
विशेषतः स्थानिक मराठी तरुणांसाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉकर्स झोन उभारावा, जेणेकरून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे.
प्रशासनाला इशारा
मनसेने स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता आणून सर्वांवर समान निकष लावले नाहीत, तर हा प्रश्न अधिक चिघळेल. तसेच स्थानिक हॉकर्सवर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि त्यांच्या हक्कासाठी पक्ष ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही देण्यात आली.
खोटे नगर ते कालिका माता मंदिर परिसरातील अतिक्रमणांचे समान निकषांवर पुनरावलोकन करावे आणि बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच गरज पडल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई जनतेच्या सहकार्याने स्वतः हाती घेण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव यांसह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक हॉकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित: जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप-महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, बादशहा शहा, अल्ताफ शहा, महिला सेनेच्या अनिता कापुरे, भूषण ठाकूर, हेमंत मराठी, यश पाटील, गोपाल कोळी, शुभम काळे, चिराग लोखंडे, चुनेस अत्तरदे, सोनू निमाडकर, ऋषी पाटील, साई पाटील, गौरव पाटील, दर्शन पाटील, पंकज बोरसे, रोहित कोळी, आदित्य गायकवाड, राहुल सोनवणे, पियुष जहा, धीरज काळे, श्याम मराठे, माया मराठे.
