साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात भरदिवसा इक्वीटस स्मॉल बँकेचे ATM मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील ही अट्टल गुन्हेगारांची टोळी असून, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसह देशभरात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरातील सत्यम प्लाझा कॉम्पलेक्समधील इक्वीटस स्मॉल बँकेचे अख्खे ATM मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीष विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान, हे संशयीत पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने जळगाव शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून मन्यारखेडा रोडवरून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी: १. मोबीन मिला (वय २८, रा. नकुर, जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश)
२. अब्दुल करीम नुर हसन (वय ५२, रा. नकुर, जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांच्यासोबत त्यांचे इतर ३ साथीदार (फरहान, अकबर आणि मुजाहीद) यांचा देखील या गुन्ह्यात समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
धक्कादायक कबुलीआरोपींनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. ही चोरी करण्यासाठी त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून एक महींद्रा पिकअप गाडी चोरली होती आणि तिचा वापर ATM उचकटण्यासाठी केला. याशिवाय पुणे ग्रामीणमधील यवत पोलीस स्टेशन आणि झारखंडमध्येही त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (किंमत ५०,०००/- रुपये) रेडमी मोबाईल फोन रोख रक्कम आणि दोन हेल्मेट एकूण किंमत: ६१,२००/- रुपये सदर आरोपींना पुढील तपासासाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
