साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी इसमाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी गजानन विठोबा सजराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे जळगाव बसस्थानक परिसरात उभे असताना आरोपींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका आरोपीने सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीस खडा आणण्यास सांगून हातचलाखी करत फिर्यादीला बसस्थानकातील कोपऱ्यात नेले. त्यानंतर शनीची बाधा काढून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी आणि पैसे घेऊन आरोपी पसार झाले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करत आरोपींचा शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे नागरदेवळा, ता. पाचोरा येथे छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. निवाणी रोड, बाजारजवळ, नागरदेवळा, ता. पाचोरा)
- गोसहीन जब्बार मदारी (वय ३१, रा. झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, नागर रोड, चाळीसगाव)
दरम्यान, या गुन्ह्यात सदाम मदारी नावाच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
