Jain Irrigation’NAAS’ Member : जैन इरिगेशन आता ‘एनएएएस’ची कॉर्पोरेट सदस्य

0
4

कृषी संशोधन अन्‌ विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेसची (एनएएएस) प्रतिष्ठित कॉर्पोरेट सदस्य बनली आहे. अशा सदस्यत्वाने कंपनीला कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात नवीन संधीचे दालन उपलब्ध होणार आहेत. १९९० मध्ये एनएएएस ही स्थापन झालेली संस्था आहे. ती भारतातील कृषी संशोधन, शिक्षण आणि धोरणांसाठी एक स्वतंत्र वैज्ञानिक थिंक टँक म्हणून ओळखली जाते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुलात कार्यरत ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) सोबत महत्त्वाचे काम करत आहे. यासंदर्भात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सदस्यत्वाबाबत आनंद व्यक्त केला आहे. सध्या एनएएएसमध्ये ८२१ सदस्य आहेत. परंतु कॉर्पोरेट सदस्य म्हणून जैन इरिगेशन ही एकमेव कंपनी असल्याचे सांगण्यात आले.

एनएएएसचे मुख्य उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्टतेची ओळख करणे, सहकार्य वाढवणे आणि ज्ञानाचे प्रकाशन करणे असे आहे. त्यासाठी संस्था विविध परिषदा, कार्यशाळा, फेलोशिपसारखे पुरस्कार आणि नियमित प्रकाशने यांसारखे उपक्रम राबवते. एनएएएस आणि जैन इरिगेशनच्या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष लाभ होऊ शकेल. जैन इरिगेशनने यापूर्वीही विविध कृषी प्रकल्पांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. हे सदस्यत्व त्यांच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अशा सहकार्याने जलसंधारण व जलसुरक्षाद्वारे शाश्वत शेतीतून उत्पादकता वाढविण्यास मदत होईल, असेही या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here