परीक्षार्थ्यांना ‘कारणे दाखवा नोटीसां’सह विद्यापीठात खुलाशासाठी हजर राहण्याच्या सूचना

0
54

साईमत, फैजपूर, ता. यावल : प्रतिनिधी

येथील मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सामूहिक कॉपी कांडामध्ये पकडल्या गेलेल्या २६ विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवारी, ४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष हजर राहून खुलासा सादर करण्यासाठी ‘कारणे दाखवा नोटीसा’ देण्यात आल्या आहेत.

फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात २८ ऑगस्ट रोजी एफ. वाय. बी.फॉर्म तसेच एफ. वाय. एम.फॉर्म या वर्गाच्या प्रथम सेमिस्टर परीक्षेत विदयापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने प्रथम वर्ष बी.फार्मचे २२ विद्यार्थी तर प्रथम वर्ष एम.फॉर्मचे ४ विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडले होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात सर्वत्र खळबळ उडाली होती.

सर्व विद्यार्थ्यांचे पेपर विद्यापीठाने नेमलेल्या धरणगाव येथील महाविद्यालयाच्या भरारी पथकाने आपल्या ताब्यात घेतले. भरारी पथकाने यासंबंधीचा अहवाल विद्यापीठात सादर केला. अशा गंभीर घटनेची नोंद घेत विद्यापीठाने एक महिन्यानंतर कॉपी करताना आढळून आलेल्या २६ विद्यार्थ्यांना आपल्यावरील आरोपांच्या अनुषंगाने आपले म्हणणे मांडण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित विद्यार्थ्यांवर आता विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करते? एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉप्या करणारे सापडलेल्या महाविद्यालयावर काय कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here