बैल पोळा सणावरही महागाईची ‘झूल’

0
1

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघा एक दिवसांवर येऊन ठेपला आहे.शेतकरी आपल्या लाडक्या ‌‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे मात्र महागाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे जळगावातील बाजारपेठेत दिसून आले. शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काळ्या मातीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणाची उतरण करण्यासाठी पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरत आला आहे.यानिमित्ताने शहरातील बोहरा बाजार,सुभाषचौक,महात्मा गांधी मार्केट परिसरात बाजारपेठही सजली आहे. बैलांना पोळ्यानिमित्त सजावट करण्यासाठी आकर्षक वस्तू विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत मात्र या सर्व साहित्यांच्या कच्च्या मालाची दरवाढ व त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे बैलांचे शृंगार साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले आहे.त्यामुळे बैलपोळ्यावर महागाईची ‌‘झूल’ दिसून येत आहे.

नुकताच पाऊस बरसल्याने यापूर्वी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे सर्जाराजासाठी ‌‘होऊन जाऊ दे खर्च’, म्हणत शेतकरी सज्ज झाला आहे.शहरात मातीचे विविध आकारातील बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले असून बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्याचेही भाव वाढले आहेत.

लाकडी नंदीचेही दर गगनाला
बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.या दिवशी लहान मुले आपापल्या लाकडी बैलाला सजवतात.तान्हा पोळ्यासाठी बाजारपेठेत लाकडी नंदी विक्रीस आलेले आहेत मात्र महागाईचा फटका लाकडी नंदीलाही बसला असून दर गगनाला भिडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here