
साईमत वृत्तसेवा
देशातील सर्वात मोठी विमान सेवा कंपनी इंडिगो अभूतपूर्व संकटात सापडली असून गेल्या चार दिवसांत तब्बल 1000 हून अधिक फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवार–गुरुवारीच 450 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आल्याने देशभरातील विमानतळांवर प्रचंड गोंधळ माजला. प्रवासी अडकून पडले, तिकीट दर झपाट्याने वाढले आणि अनेक विमानतळांवर संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.
देशातील प्रवासी विमान वाहतुकीत इंडिगोचा 65% हिस्सा असल्यामुळे या कंपनीतील बिघाडाचा थेट परिणाम संपूर्ण विमानसेवा व्यवस्थेवर दिसून आला. दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसह प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
संकटाची पहिली ठिणगी : A320 सॉफ्टवेअर ग्लिच
इंडिगोने फ्लाइट रद्द करण्यामागे विविध कारणे दिली. सुरुवातीला एअरबस A320 विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपडेशनदरम्यान गंभीर ग्लिच आल्याने काही उड्डाणे रद्द करण्यात आली.
त्याचवेळी उड्डाण वेळापत्रकात हिवाळी बदल आणि प्रतिकूल हवामानाची कारणेही पुढे करण्यात आली.
मात्र विमान उद्योगातील जाणकारांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, खरा गोंधळ Flight Duty Time Limitation (FDTL) नियमांच्या अंमलबजावणीमुळे झाला.
खरा स्फोट : FDTL नियम लागू आणि पायलट–क्रू सुट्टीवर
जानेवारी 2024 मध्ये बनविलेले FDTL नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आले. या नव्या नियमांमुळे पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामाचे तास, विश्रांतीची वेळ आणि साप्ताहिक सुट्टी यामध्ये मोठे बदल झाले—
-
आठवड्याचे 36 तास सुट्टी वाढवून 48 तास
-
नाईट लँडिंगची मर्यादा: ६ वरून २
-
रात्री उड्डाण मर्यादा : जास्तीत जास्त 8 तास
-
नाईट ड्युटी विंडो : रात्री 12 ते पहाटे 6
इंडिगोला या नियमावलीला मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र DGCAने मुदतवाढ नाकारताच कंपनीचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले.
सॉफ्टवेअर अपडेशनमुळे उड्डाणे उशिरा झाली आणि अनेक पायलटांचे ड्यूटी अवर्स “नाईट विंडो”मध्ये गेले. नियमांनुसार ते स्वयंचलितपणे अनिवार्य विश्रांतीवर गेले. परिणामी, उड्डाणांसाठी क्रूच उपलब्ध राहिला नाही.
उपलब्ध क्रूचा तुटवडा आणि मोठी रद्दीकरणे
इंडिगो संस्थेकडून दररोज 2200 फ्लाइट चालवल्या जातात.
क्रू उपलब्ध नसल्याने 10% फ्लाइट कमी कराव्या लागल्या तर त्याचा अर्थ 200 ते 400 फ्लाइट एका दिवसात रद्द होणे—जे प्रत्यक्षात घडले.
-
दिल्ली – 135 उड्डाणे, 90 लँडिंग रद्द
-
बंगळुरू – 50 उड्डाणे, 52 लँडिंग रद्द
-
48 तासांत – 600 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द
यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले. इतर एअरलाइननेही दर वाढविल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले.
DGCAचा हस्तक्षेप – अखेर दिलासा!
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि विमानतळांवरील गोंधळ पाहता DGCAने अखेर हस्तक्षेप केला.
1 नोव्हेंबरपासून लागू केलेल्या FDTLमधील साप्ताहिक सुट्टीसंबंधीचा कठोर नियम मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.
DGCAच्या निर्णयानंतर इंडिगोने जाहीर केले की—
“पुढील 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. आमची टीम 24 तास काम करत आहे आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व उपाय केले जात आहेत.”
नियोजनातील भलीमोठी चूक?
विमान उद्योगातील तज्ज्ञांचे मत स्पष्ट—
-
A320 सॉफ्टवेअर ग्लिच
-
विंटर शेड्यूलमधील उड्डाणांची वाढ
-
FDTL नियमांची अचानक अंमलबजावणी
-
क्रू मॅनेजमेंटमधील त्रुटी
या सगळ्यांचा “परफेक्ट स्टॉर्म” तयार झाला आणि इंडिगोची सिस्टम कोसळली.
प्रवाशांची मागणी – नुकसानभरपाई आणि स्थिर वेळापत्रक
प्रवाशांनी तिकिटांच्या वाढत्या दरांवर, रद्दीकरणाच्या नोटिस न मिळाल्यावर, भरपाई न मिळाल्यावर संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी DGCAकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.


