साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
अवघ्या विश्वातील शक्तिशाली, अनुभवी आणि सक्षम सैन्य भारताचे आहे. भारतीय सेनेने आतापर्यंत देशांतर्गत आणि विदेशातही विविध लढाया व कारवायांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून नावलौकिक प्राप्त केला आहे. अशा महानतम सैन्याविषयी समाजातील प्रत्येक घटकाने अभिमान बाळगावा, सन्मान करावा. आपण ज्याही क्षेत्रात आहोत तिथे सर्वोत्तम कामगिरी करून देशाचा मान वाढवावा, असे आवाहन धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील एनसीसी अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले. ते डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील एमबीबीएस प्रथम व द्वितीय वर्षाच्या नवोदित डॉक्टरांसमोर ‘आर्मी डे’च्या अनुषंगाने बोलत होते. याप्रसंगी डॉ.नारायण आर्वीकर डायरेक्टर, डॉ.प्रशांत सोळंके अधिष्ठाता, डॉ.प्रशांत गुडेटी यासोबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व वैद्यकीय शिक्षण घेणारे युवक उपस्थित होते.
याप्रसंगी विविध व्याख्याने, उपक्रम, परेड्स यासोबत भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांनी स्तुत्य असा उपक्रम राबविला. याप्रसंगी अत्यंत ओघवत्या शैलीत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही सशस्त्र सेनेबद्दल कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी सविस्तर माहिती दिली.
इयत्ता बारावीनंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन आर्मेड फॉर्सेस मेडिकल कॉलेज पुणे इथूनही वैद्यकीय शिक्षण घेता येते. तसेच एमबीबीएस, बीडीएस पूर्ण केल्यावरही मेडिकल ऑफिसर म्हणून मिलिटरी सर्विस करता येते. यासोबत शॉर्ट सर्विस कमिशन, सीडीएस व तत्सम एन्ट्री च्या माध्यमातून विविध रँक्सवर सन्मानपूर्वक जबाबदारी पार पाडता येते. त्यामुळे सशस्त्र सेनेत दहा वर्ष काम करा आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवा, असा सल्ला कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी उपस्थित नवोदित डॉक्टरांना दिला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेचा प्रचंड अभिमान असल्याचे मनोगत व्यक्त करीत यापुढेही घराघरात जाऊन भारतीय सेनेची महती सांगण्याचा मानस व्यक्त केला. यशस्वीतेसाठी अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.