साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आमोदे येथील घनश्याम काशीराम विद्यालयात २०२२-२३ वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ठेवीदारांनी ठेवलेल्या ४ लाख ३९ हजार ४४८ रकमेवरील रुपये २८ हजार ३५२ चे वार्षिक पारितोषिक समारंभात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. संगीता महाजन होत्या.
अनुभव ही खूप मोठी शिदोरी असते. यश प्राप्तीसाठी अथक परिश्रमाची गरज आहे. जीवनात भावनिक बुद्धिमत्ता व चांगुलपणा गुणांचा विकास केला तर यश अधिकच सुंदर दिसेल, अशी अपेक्षा डॉ. अनिल झोपे यांनी व्यक्त केली. या प्रसंगाचे औचित्य साधून डॉ. संगीता महाजन यांच्या हस्ते ‘आनंदी वारली, मनाला भावली’ या विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अंतर्गत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नुकतेच डायटच्यावतीने डॉ. संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या प्रेरणेतून मुख्याध्यापक एस. बी. बोठे यांनी वारली कलेचे प्रशिक्षण घेतले होते. मुख्याध्यापकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन शालेय भिंतींची रंगरंगोटी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत करून घेण्याबाबतचा मानस व्यक्त केला.
वारली कला विद्यार्थी व शिक्षकांना अध्ययन अध्यापनात कशी उपयोगी आहे, त्याची उदाहरणे डॉ.संगीता महाजन यांनी मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. उमाकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन ललित महाजन, सदस्य धनराज चौधरी, प्रमोद वाघुळदे, प्रवीण महाजन, नामदेव पाटील, वैभव चौधरी, एकनाथ लोखंडे, शाळेचे माजी मुख्याध्यापक के. एच.पाटील उपस्थित होते.
यावेळी शिक्षक मनोगत लीना इंगळे तर विद्यार्थी मनोगत डिंपल सरोदे, आम्रपाली तायडे यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव बोठे, सूत्रसंचालन ईश्वर चौधरी तर आभार चारुलता महाजन यांनी मानले.