साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र जळगाव मदर ब्लड सेंटर असलेल्या आई हॉस्पिटल्स यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. सोहळ्याला एरंडोल, धरणगाव, कासोदा, पारोळा, भडगाव तालुक्यांमधील डॉक्टर्स, समाजसेवक, रक्तदान शिबिर आयोजक, मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून एरंडोल तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश पवार, धरणगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद डहाळे, डॉ.अरुण कुलकर्णी, एरंडोलचे तालुका पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, सहप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ. नरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्त केंद्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत माहिती देत नॅट तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी डॉ. सुधीर काबरा यांनी एरंडोल तालुक्यात सुरू केलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले. धरणगावचे डॉ. मिलिंद डहाळे यांनी अडचणीच्या प्रसंगी रक्ताअभावी येणाऱ्या अडचणी व या स्टोरेज सेंटरमुळे होणारा फायदा यावर मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे संग्राम जोशी आणि संदीप जोशी यांनी रक्तदान जनजागृतीपर स्वरचित पोवाडा सादर केला. ब्रह्मकुमारी केंद्रीय विश्वविद्यालयाच्या पुष्पादीदी यांनी रुग्णसेवेच्या कार्याला आशीर्वाद दिले.
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसमार्फत सुरू असलेल्या सर्व उपक्रमांबाबत माहिती देत भविष्यात रेडक्रॉसमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व सेवाकार्याची माहिती दिली. आई हॉस्पिटलच्या संचालक डॉ. किरण पाटील यांनी रेडक्रॉसने रुग्णसेवेची संधी दिल्याबद्दल रेडक्रॉसचे आभार व्यक्त केले. तसेच यशोदाई ब्लड स्टोरेजच्या माध्यमातून २४ तास ही रुग्णसेवा सुरू राहणार असल्याचे आश्वासन दिले.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी एरंडोल, पारोळा धरणगाव, कासोदा, भडगावमधील सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचा व रक्तदान शिबिर आयोजकांचा पल्स ऑक्सिमीटर देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एरंडोल तालुक्यातील सर्व हॉस्पिटल्समधील पॅरामेडिकल स्टाफला हायजेनिक किट भेट देण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले.