साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी.बी.जगत्पुरिया यांचा नागपूर येथे दि.२८ व २९ डिसेंबरला होणाऱ्या ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मान होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षानी कथाकार सुरेश पाचकवडे तर उद्घाटक म्हणून कन्हेरे फाउंडेशनचे किशोर कन्हेरे असतील. विशेष पाहुणे म्हणून ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, टोकियो, जपान येथील कादंबरीकार उर्मिला देवेन उपस्थित राहतील. साहित्य संमेलन नागपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, येथे होईल.
डी.बी. जगत्पुरिया यांच्या नावावर मराठी, हिन्दी कविता संग्रह, सत्त्वसार, मूल्याक्ष, दस्तऐवज असे पाच समीक्षा ग्रंथ सामाजिक वैचारिक गंध, दौलत हा कथा संग्रह, नाटक, एकांकिका असे लेखन प्रकाशित आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील सुमारे २५ ते ३० दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित होते. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांसह त्यांच्या नावे सात राष्ट्रीय पुरस्कार आहेत. अस्मितादर्श, अंकुर साहित्य संमेलनांसह काही संमेलनांचे अध्यक्ष, उद्घाटक, परिसंवादाचे अध्यक्ष व वक्ते म्हणून त्यांनी सहभाग नोंदविला आहे. यवतमाळ येथे झालेल्या आगळ्या-वेगळ्या जागर साहित्य संमेलानात ते परिसंवादाचे प्रमुख अध्यक्ष होते. कवी संमेलन शिखरावर नेणारे सूत्रसंचालक म्हणून त्यांची ख्याती आहे.
याबद्दल त्यांचे सर्वश्री डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ.युवराज सोनटक्के, डॉ. गजानन सोनुने, डॉ. विनोद सिनकर, डॉ. प्रकाश नाईक, डॉ. प्रा. डी. व्ही. पाटील, जगदीश देवपूरकर आदींनी अभिनंदन केले आहे.