बोहरी कॉलनीतील अशोक बागुल यांच्याकडे अनेक वर्षांची परंपरा कायम
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
येथील जुने धुळ्यातील वरखेडी रस्त्यालगतच्या बोहरी कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम राखत जि.प.चे आरोग्य खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक रामकृष्ण बागुल (सोनार) यांच्या निवासस्थानी कानबाईची यंदाही स्थापना केली होती. सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी कानबाईच्या महोत्सवाची विधिवत उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी बाहेरगावाहून आलेले नातेवाईक, मित्र परिवार, धुनीवाले दादाजी परिवारातील सदस्य एकत्र आले होते. समारोपाच्या दिवशी अशोक बागुल, हेमकांत बागुल, वर्षा बागुल, विनोद बागुल, जयेश बागुल, राज बागुल, हर्षा बागुल यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन आरती करण्यात आली. यावेळी पत्रकार शरद भालेराव, रेखा भालेराव, हिमांशु भालेराव, धनंजय सोनार, आशा सोनार, ऋषी सोनार, देविका सोनार यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते.
उत्सव पाहुणी म्हणून आलेल्या कानबाईच्या उत्सवामुळे घरात साफसफाई करून रंगरंगोटी, उत्कृष्ट आरास, रांगोळ्या, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशोक बागुल यांच्या निवासस्थानी कानबाईची स्थापना केल्यावर बाहेरगावासह भाऊबंदकी, नातेवाईक, मित्र मंडळी दर्शन घेण्यासाठी येतात. उत्सवानिमित्त कानबाईच्या विविध खान्देशी गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच रात्रभर देवीसाठी जागरण करण्यात आले.
‘कानबाईच्या’ जयघोषाने परिसर दणाणला
दुसऱ्या दिवशी ४ ऑगस्ट रोजी सकाळी कानबाईची सर्वांच्या साक्षीने वाजतगाजत, फुगड्या खेळत ‘कानबाई माता की जय’, ‘रानबाई माता की जय’ अशा जयघोषात परिसर दणाणून मिरवणुकही उत्साहात काढण्यात आली. तसेच पांझरा कान नदीवर जाऊन शांततेत कानबाईचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, धुळे येथे ठिकठिकाणी कानबाईच्या उत्सवाचा समारोप जोरदार मिरवणूक काढून शांततेत पार पडला.