सहा महिन्यात विद्यापीठातील ९५ विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीत मिळाला रोजगार

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या (CTPC) वतीने गेल्या सहा महिन्यात नामांकित ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यात ९५ विद्यार्थ्यांना या उद्योग समूहांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलला बळकटी दिली जात असून विद्यापीठात कॅम्पस् आणि विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील व राज्याबाहेरील नामांकित उद्योग समूहांना विद्यापीठात परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यात ९५ विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणशास्त्र प्रशाळेचे १३, रासायनिक प्रशाळेचे ११, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे १५, गणितशास्त्र प्रशाळेचे ७, भौतिकशास्त्र प्रशाळेचे २ व विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे ३५ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यात ॲक्सेंझर इंडिया प्रा. लि. पुणे, बर्गर पेन्ट सिंगापूर, आयसीए पीडीलाईट मुंबई, ग्राऊर ॲण्ड विईल लि. मुंबई, स्प्रेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रिज मुंबई, सीके बिर्ला ग्रुप ओरियन्ट सिमेंट लि. जळगाव. या काही प्रमुख कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना चार लाख ते साडेपाच लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त झाले आहे. बर्गर पेन्टस् मध्ये वार्षिक २१ लाख रूपये पॅकेज दिले गेले.

या कक्षाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतींना जाण्यापूर्वी आत्मविश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी सॉफ्ट स्कील, लाईफ स्कील, व्यक्तीमत्व विकास, मुलाखत कौशल्य, वागणूक आदी विविध विषयांवर गेल्या सहा महिन्यात सहा कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळेचा लाभ २८६ विद्यार्थ्यांनी घेतला. अशी माहिती या कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार व प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here