साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील औदुंबर नगरातील अंधारात असलेल्या नागरिकांच्या मदतीला काँग्रेसचे अध्यक्ष धावून आले होते. त्यांनी केलेली मागणी मंजूर झाल्याने वीज महावितरण कंपनीवरचे हल्लाबोल आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे.
शहरातील जुन्या सारोळा बुद्रुक रस्त्यावरील औदुंबर नगरातील रहिवाशी गेल्या दीड वर्षांपासून इलेक्ट्रिक पोलसाठी संघर्ष करत होते. येथील रहिवाशांनी अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तरीही समस्या सोडविली गेली नाही. त्यातच वीज महावितरण कंपनीने स्थानिक नागरिकांनी इतरांकडून घेतलेला वीज पुरवठा खंडित केल्याने हा परिसर अंधारात आला. अशावेळी स्थानिक रहिवासींनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना परिसरात बोलावून समस्या त्वरित सोडवा, अशी मागणी केली होती. तेव्हा सचिन सोमवंशी यांनी परिसरातील महिला आणि पुरुष यांना सोबत घेऊन वीज महावितरण कंपनीच्या मुख्यालयातच आंदोलन करण्याच्या इराद्यात गेल्यावर वीज महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हेलोडे यांना नागरिकांच्या समस्या सांगितल्या. त्यावर त्यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांना परिसरातील अंदाज पत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या.
वृध्द महिलांनी भरभरून दिले आशीर्वाद
वीज महावितरण कंपनीचे अधिकारी यांची माणुसकी आणि काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांची नागरिकांसाठी तळमळ पाहता वृध्द महिलांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि नागरिक कार्यालयातून परत गेले. यावेळी परिसरात विनोद सूर्यवंशी, जीवन मराठे, समाधान कोटकर, निंबा महाजन, रत्ना परदेशी, वत्सला सूर्यवंशी, जिजाबाई पाटील, द्रुपदाबाई महाजन, संगीता पाटील, भूषण लोहार, अश्विनी लोहार, रेणुका लोहार, जितेंद्र लोहार आदी उपस्थित होते.