Bad Addictions : जीवनात चांगल्यांची ‘संगत’ धरुन वाईट ‘व्यसनांपासून’ दूर रहावे

0
13

वाघनगर परिसरातील संगीतमय भागवत कथेत मुकेश महाराज पारगावकर यांचा उपदेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जीवनात आई-वडिलांची सेवा करावी. जीवनात काकडा आरतीसह हरिपाठाचे विशेष महत्त्व आहे. तसेच चांगल्या माणसांची संगत धरुन वाईट व्यसनांपासून दूर रहावे, असा उपदेश ‘झी टीव्ही’ फेम मुकेश महाराज पारगावकर यांनी देऊन भक्तिमार्गाचे सोपे सूत्र स्पष्ट केले. वाघनगर परिसरातील महाकालेश्वर महादेव मंदिर येथे श्री भवानी महिला मंडळाच्यावतीने सात दिवसीय संगीतमय श्रीमद्‌ भागवत महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. त्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १६ ऑगस्टपासून दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत होणाऱ्या धार्मिक पर्वामुळे मंदिराचा परिसर भक्तिरसाने उजळून निघाला आहे. कथेचे निरूपण ते करत आहेत. कथेचा समारोप शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

मुकेश महाराज यांची शैली केवळ प्रवचनापुरती मर्यादित नाही. त्यामुळे त्यांनी संगीतमय सादरीकरणासोबतच सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जीवनमूल्ये अधोरेखित केले. एकच जात आहे ती म्हणजे माणूस आणि धर्म. म्हणून खरी माणुसकी आहे. समाजातला ‘मी’ पणा सोडल्याशिवाय खरी भक्ती रुजत नाही, असा प्रभावी संदेश देत त्यांनी सामाजिक ऐक्याचा धडा दिला.

‘मानवी एकतेची गरज’वर महाराजांचा भर

भक्तिगीत, देखावे आणि प्रवचनाच्या संगमामुळे भाविक भारावून गेले. कथेमधून केवळ अध्यात्मिक ऊर्जा मिळत नाही तर सामाजिक प्रबोधनही साधले जात आहे. व्यसनमुक्तीचा संदेश, कौटुंबिक संस्कारांचे महत्त्व तसेच मानवी एकतेची गरज यावर महाराजांनी दिलेला भर विशेषतः तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. धर्मकथा फक्त पूजा-अर्चनेपुरती मर्यादित न राहता ती समाजातील वाईट प्रवृत्तींपासून दूर नेणारी शक्ती आहे, हे कार्यक्रमातून अधोरेखित होत आहे.

महाकालेश्वर मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

महाकालेश्वर मंदिर परिसरात भाविक दररोज सायंकाळी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त उपस्थिती देत आहेत. त्यात महिलांसह युवा, ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भक्तिगीतांच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. धार्मिक उपक्रमासाठी सरपंच संतोष आप्पा पाटील, नगरसेविका उषा पाटील यांचे सहकार्य लाभले. सर्व भाविकांनी अशा आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेण्याचे आवाहन वाघनगरातील भवानी महिला मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here