जिल्हा प्रशासनास आदेश : दिवाळीत निवडणूक होण्याची शक्यता
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
राज्यात मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि गण निश्चितीसाठी ग्रामविकास विभागाचा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. आदेशानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि ११२ गण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषद सदस्यांची १६ जानेवारी २०२५ रोजी मुदत संपली. तेव्हापासून जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समित्यांवर प्रशासक कार्यरत आहेत. निवडणुका कधी होतील, याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने दिवाळीत निवडणुका होण्याची शक्यता आहे. आदेशात २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन गटासह गणांची निश्चिती होणार आहे.
जिल्हा परिषद गटांची रचना करताना सदस्य संख्या यांचे प्रमाण कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ अशी संख्या निश्चित करण्याबाचत सूचना दिल्या आहेत. सूत्राचा विचार केल्यास जिल्हा परिषदेत ५६ गट आणि ११२ गण होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ५६ जिल्हा परिषद गट आणि ११२ पंचायत समिती गण असण्याची शक्यता आहे. त्यात धुळे तालुक्यात १५ जिल्हा परिषद गट, ३० पंचायत समिती गण, साक्री तालुक्यात १७ गट आणि ३४ गण, शिरपूर तालुक्यात १४ गट, २८ गण तर शिंदखेड्यात १० गट आणि २० गण राहतील. जिल्हा परिषदेची निवडणूक २०१८ मध्ये झाली होती. त्यात भाजप ३९, काँग्रेस ७, शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३ तर अपक्ष ३ सदस्य विजयी झाले होते. त्यात भाजपने जि.प. त प्रथमच एकहाती सत्ता मिळवली होती.
असा असेल प्रभाग रचनेचा कार्यक्रम
– प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करणे : १४ जुलै रोजी
– जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती, सूचना सादर करणे : २१ जुलैपर्यंत
– प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे. २८ जुलै २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी देऊन निर्णय देणे.
– अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे १८ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येईल.
– राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
प्रभाग संख्या निश्चित करताना प्रत्येक पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषदेच्या गटांची रचना केल्यानंतर त्या प्रमाणात पंचायत समितीचे प्रत्येक निवडणूक विभागाचे दोन निर्वाचक गणात विभाजन असावे. गणाची रचना करीत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागिले त्या गट आणि गणास देय असलेली एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार निवडणूक जिल्हा परिषद गट व गणाची सदस्य संख्या निश्चित करा. गट आणि गण रखना करताना त्याची सुरुवात उत्तर दिशेकडून करून, उत्तरेकडून-ईशान्येकडे, त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा. गट व गण यांचे क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. जिल्हा परिषद गट व गणाची सरासरी लोकसंख्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त ठेवता येईल. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची रचना करताना गुगल मॅप नकाशे तयार करा. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणच्या हद्दी काळ्या रंगाच्या ठिपक्यांनी चिन्हांकित करा. प्रत्येक ग्रामपंचायतीचे नाव, लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लोकसंख्येची नोंद घ्या, असे आदेशात नमूद केले आहे.